सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी 55 महिला बचत गटांना 33 लाख रुपयांचा फिरता निधी मंजूर ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील महिला बचत गटांच्या सक्षमिकरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 55 महिला बचत गटांना 33 लाख रुपयांच्या फिरत्या निधीला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मंजूर बचत गटांच्या खात्यात लवकरच हा निधी वर्ग होणार असून उर्वरित पात्र बचत गटांना दुसऱ्या टप्यात निधी मिळणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
महिला बचत गटांना लघु व्यवसायासाठी काही निकष व गुणांच्या आधारावर हा निधी दिला जातो. त्यानंतर या गटांना मोठे कर्ज दिले जाते. मतदारसंघातील उंडणगाव , अंभई , घटांब्री, सिरसाळा, खुल्लोड, केळगाव या गावांतील 55 गटांना सदरील फिरता निधी मंजूर झाला आहे. महिला ग्राम संघाच्या माध्यमातून मिळालेल्या फिरत्या निधीचा विनियोग करण्यात येतो. एक प्रभाग संघ किमान 5 महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप करतात. त्यानुसार 11 महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून एकूण 55 महिला बचत गटांना 60 हजार रुपये प्रमाणे 33 लाख रुपयांचा निधी वाटप होणार आहे.
फर्दापूर, पळसखेडा व वाघेरा येथील बचत गटांचा विशेष पुरस्काराने करण्यात आला सन्मान
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील कृषी वसंत शेतकरी महिला स्वयंसहायता महिला बचत गट, फर्दापूर येथील श्री साई महिला स्वयंसहायता महिला बचत गट तर सिल्लोड तालुक्यातील वाघेरा येथील स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता बचत गटांना मुंबई येथे जागतिक महिला दिनी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
नाविन्यपूर्ण उत्पादनातून अनेक महिला बचत गटाच्या अनेक सदस्या आज स्वावलंबी झाल्याचे चित्र आहे. चिवडा, शेव, फरसाण, तूप, श्रीखंड, दही पनीर यासोबतच उपलब्ध साधन समुग्रीतून महिलांनी नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साधण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांनी चूल व मूल पुरते सीमित न राहता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून पुढे यावे. महिलांच्या स्वावलंबन व आर्थिक सक्षमिकरणासाठी राज्यशासन महिला बचत गटांच्या मागे खंबीरपणे उभे आहे.