स्पर्धा परीक्षांच्या यशस्वीतेसाठी नियोजनबद्धता आणि परिश्रमाची आवश्यकता : प्रा.विकास गिरासे
चोपडा (विश्वास वाडे) प्रा.विकास गिरासे (द युनिक अकॅडमी पुणे ,शाखा प्रमुख जळगाव) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा व द युनिक अकॅडमी पुणे, शाखा- जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. विकास गिरासे (युनिक अकॅडमी पुणे शाखा जळगाव) हे होते. तर या ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे हे होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑनलाईन उपस्थित मान्यवर प्रा.विकास गिरासे, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा.चन्द्रकांत खराटे डॉ. महादेव वाघमोडे यांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शन प्रसंगी प्रा. विकास गिरासे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यास हा नियोजनबद्ध असायला पाहिजे. त्याचबरोबर कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. उच्च स्वप्न साकार करायचे असेल तर अभ्यासाच्या भट्टीत तावून सुलाखून निघण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी अभ्यासाची दिशा ठरविणे अतिशय महत्त्वाचे असते.तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो. आजच्या काळात काही केले नाही तर काहीच मिळणार नाही.असेही त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.महादेव वाघमोडे यांनी सांगितले की, उच्च स्वप्न पाहिले पाहिजे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक विचार व प्रयत्नाची जोड असणे अतिशय महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, दृढनिश्चय व अभ्यासात सातत्य असायला पाहिजे. व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी घेतला. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. अरुण डी. मोरे यांनी केले. तर आभार प्रा. दिपकराव देवरे यांनी मानले.