विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह शाळेतील पायाभूत सुविधा अद्यावत करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ (प्रतिनिधी) इयत्ता तीसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढिसाठी भाषा कौशल्य आणि गणीत या दोन बाबींवर लक्ष केंद्रीत करून शाळेतील पायाभुत सुविधा वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिक्षण विभागाला दिले.
राज्यात 2026-27 पर्यंत इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच अपेक्षीत क्षमता प्राप्त करून शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यात शासनाने मान्यता दिली असून जिल्हाधिकारी यांनी आज या अभियानाचा आढावा घेतला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रेखा महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी पुढे बोलतांना सांगितले की भाषा व गणीतामधील गुणवत्तेसोबतच प्रत्येक शाळेत पायाभूत सुविधा अद्यावत कराव्या. यासाठी टिचींग लर्निंग साहित्य, डिजीटल शाळा तयार करण्यासाठी, टिव्ही, एलइडी स्क्रीनचा प्रभावीपणे वापर करणे, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे, शाळेतील वर्ग खोल्या, शौचालय यासारखा सुविधा वाढविण्यात याव्या. जिल्ह्यात आदिवासी बहुल संख्या पाहता आदिवासी आश्रम शाळेत आवश्यकतेनुसार वेगळ्या शैक्षणीक साहित्याची गरज असल्यास त्याप्रमाणे साहित्य अद्यावत करण्याचेही त्यांनी सांगितले.
सर्व गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे तालुक्यात इयत्ता तीसरी व पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासंबंधीची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. यात ओघवते प्रकट/ मौखिक वाचन कौशल्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय टक्केवारी, मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांची टक्केवारी, शाळा पातळीवरील प्रतिसादाच्या मूल्यमापनासाठी सि.आर.सी, बी.आर.सी. यांनी शाळांना दिलेल्या भेटींची संख्या, भेटीनंतर दिलेल्या अहवालानुसार नाविण्यपूर्ण, खेळाव्दारे किंवा आनंददायी पध्दतीने अध्ययन-अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संख्या. मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यासंबंधी अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती/ विकसन करुन पायाभूत इयत्ता १ली ते ३री मध्ये प्रत्यक्ष वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, निपूण भारत लक्ष्य अभियानाविषयी पालकांना अवगत करणाऱ्या शाळांची संख्य, शिक्षक माहितीपुस्तिका, शिक्षकांसाठीचे स्त्रोत साहित्य, क्यु.आर. कोड, इत्यादी कंटेंट साहित्य तथा दिक्षा अॅप याबाबतीत अवगत करणे, इयत्ता पहिली ते तीसरीच्या अध्ययन निष्पत्तीचे सुस्पष्ट माहिती आणि त्याचे विस्तृत विवेचन स्थानिक भाषामध्ये दिक्षा अॅप वर उपलब्ध करणे, शिक्षकांना उपरोक्त विविध स्त्रोतांची सुस्पष्टता आलेल्यांची टक्केवारी, विद्या प्रवेश अंतर्गत शाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने इयत्ता पहिली मध्ये प्रवेशासपात्र असणाऱ्या मुलांची संख्या वाढविण्यावर भर देण्याचेही जिल्हाधिकारी यांनी निर्देशीत केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिक्षकांनी निपुण भारत मध्ये नेमके काय करायचे याबाबत स्पष्टता जाणून घ्यावी व शासनाने 27 आक्टोबर 2021 च्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार नियोजनपुर्वक अभियानाची अंमलबजावणी करावी असे सांगितले. बैठकीला नवोदय विद्यालयाचे प्राचार्य धोपटे, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र रामटेके, सर्व तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षा अभियानचे अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.