महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते 8 कोटी 70 लाख रुपयांच्या रस्ता कामाचे भूमिपूजन
बनोटी - सोयगाव - फर्दापूर , पळसखेडा ते वरखेडी तांडा रस्ता होणार चकाचक
सोयगाव ( विवेक महाजन तालुका प्रतिनिधी ) दि.18, सोयगाव तालुक्यातील बनोटी – सोयगाव – फर्दापूर, व पळसखेडा – वरखेडी , वरखेडी तांडा तसेच रामा 24 ते न्हावी तांडा या रस्ता कामाचे भूमिपूजन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते गुरुवार रोजी संपन्न झाले. या रत्याच्या कामासाठी पहिल्या टप्यात एकूण 8 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याने बनोटी – सोयगाव – फर्दापूर , पळसखेडा ते वरखेडी तांडा तसेच रामा 24 ते न्हावी तांडा रस्ता चकाचक होणार आहे.
सोयगाव तालुक्यातील रस्ते विकासासाठी शासनाच्या विविध विभागास प्रस्ताव सादर करण्यात आले असून येत्या काळात एकही प्रमुख रस्ता विकासापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रस्ता भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुका संघटक दिलीप मचे, पंचायत समिती सभापती श्रीमती प्रतिभा जाधव, जि. प. सदस्य गोपीचंद जाधव, बाबू चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख धृपताबाई सोनवणे, युवासेनेचे अक्षय काळे, तहसीलदार रमेश जसवंत, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन राठोड, मुख्यमंत्री सडक योजनेचे सुनील गुडसुरकर, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश राजगुरू , उप अधीक्षक भूमिलेख कैलास मिसाळ, विस्तार अधिकारी भास्कर साळवे, जी. आर. पाटील, अशोक चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत बनोटी – सोयगाव – फर्दापूर रस्ता कामासाठी पहिल्या टप्प्यात 5 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली यातून पहिल्या टप्यात जवळपास 10 किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतून न्हावी तांडा येथे रामा 24 ते न्हावी तांडा या रस्ता कामासाठी 96 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून यातून दीड किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. तर पळसखेडा ते वरखेडी – वरखेडी तांडा यासाठी 2 कोटी 24 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून यातून 4 किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे.



