राणा दांपत्याला सत्र न्यायालयानंही दिलासा देण्यास दिला नकार
मुंबई : मुंबई हायकोर्टानंतर सत्र न्यायालयानेही खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांशी हुज्जत घालून सरकार कामात अडथळा आणल्याप्रकरणीदेखील गुन्ह्यांची नोंद केली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी दंडाधिकारी न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नसताना सत्र न्यायालयात दाद कशी मागू शकतात असं सांगत तीन दिवसांचा अवधी मागितला होता. यावेळी कोर्टाने राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची वेळ दिली आहे.
हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार
एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानी किंवा त्याच्या निवासस्थानाबाहेर धार्मिक श्लोकांचे पठण करण्याची घोषणा करणे, हे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दांपत्याची घोषणाही वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंगच असल्याचे निरीक्षण नोंदवून हायकोर्टाने त्यांच्या विरोधातील दुसरा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली.