अवधानमधील आदिवासी स्त्रियांना सॅनिटरी पॅड देऊन दिले स्वच्छतेचे धडे
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि खुशीयांन फाऊंडेशनचा उपक्रम अंतर्गत तिसऱ्या महिन्यातील सॅनिटरी पॅड वाटप
धुळे (प्रतिनिधी) अशिक्षित स्थलांतर करून आलेल्या आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते. याबाबत महिलांना सॅनिटरी पॅड वापराबाबत सक्षम करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प “सक्षम” अंतर्गत आणि खुशीयांन फाऊंडेशनच्या सहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सलग तिसऱ्या महिन्यात सॅनिटरी पॅड वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचा हा तिसरा महिना असून नियमित पॅड वाटपासोबत सक्षमीकरणाचे धडे के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या स्वयंसेविका देत आहेत. या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले, तसेच हे पॅड पुनःवापरता येण्यायोग्य आहेत. तसेच प्रकल्प “सक्षम” च्या माध्यमातून मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी आणि पॅडची सवय झाल्याने काय फरक पडत आहे याबाबत ज्ञानेश्वरी बिडवे यांनी समुपदेशनात्मक चर्चा केली. तसेच स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी भविष्यात आदिवासी पाड्यावर स्त्रियांना स्वलांबन करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, स्वयंसेविका दिव्या सावळे, कल्याणी मोरे, राखी बडगुजर, ज्ञानेश्वरी बिडवे, योगिता सावळे, हर्षाली शेजुळ, निशांत शेजुळ, सविता सोनवणे आदी उपस्थित होते.



