२५ व ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणारे गैरप्रकार रोखा ; हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासनास निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी) गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ‘ओमीक्राँन’ नावाच्या कोरोनाच्या नवा ‘व्हेरीयंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास वाढतात. अशा वेळी २५ डिसेंबर पासून ३१ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात, याद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे.

या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान अन् पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी १४ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन महसूल तहसीलदार सुनिता नेर्लीकर-क्षीरसागर यांनी स्वीकारले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, दीपक कातवरे, अजिंक्य पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते, तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणाऱ्या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. तसेच यामुळे देशाची युवापिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी वरील सर्व सूत्रांचा गांभीर्याने विचार करून सामाजिक आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. या निवेदनाद्वारे आपणास विनंती करत आहोत की, येत्या ३१ डिसेंबरच्या रात्री होणार्या गैरप्रकारांवर आणि फटाके फोडण्यावर प्रतिबंध आणून सामाजिक स्वास्थ आणि जनतेचे आरोग्य रक्षणास सहकार्य करावे.




