दोंडाईचा येथे राजपथाचा लोकार्पण सोहळा राजनाथसिंह यांच्या हस्ते पडला पार
दोंडाईचा (प्रतिनिधी) आज दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महाराणा प्रतापसिंह स्मारक, शहीद अब्दुल हमीद स्मारक, श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल स्मारक, सी.डी.एस.जनरल बिपीन रावत मार्ग नामकरण, तसेच दोंडाईचा शहराचा मुख्य रस्ता असलेल्या राजपथाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय संरक्षण मंत्री ना.राजनाथसिंह यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी खासदार डॉ.सुभाषबाबा भामरे, लोकनेते सरकारसाहेब रावल, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, मुख्याधिकारी प्रविण निकम, धुळयाचे महापौर प्रदिप कर्पे, जि.प.चे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुमताई निकम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, जि प सदस्य महाविरसिंह रावल,शहराध्यक्ष प्रविण महाजन, बांधकाम सभापती निखील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आजचा दिवस हा दोंडाईचा शहरासाठी ऐतिहासिक दिवस होता,शिवराय आणि महाराणांचे स्मारक एकाच वेळी लोकार्पण होणे हे पहिल्यांदाच होत असावे असा हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस होता.
यावेळी राजनाथसिंह म्हणाले की, महाराष्ट्र ही संताची आणि विरांची भूमी आहे, त्यामुळे मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा मला गर्व वाटतो, आज ज्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्या प्रत्येक महापुरूषांच्या मागे मोठा इतिहास आहे त्यांच्यापासुन प्रेरणा घेवून आता दोंडाईचाची जनता त्यांचा आदर्श ठेवेल, असे नमुद करत ते म्हणाले की, आम्ही जाहिरनाम्यात जे लिहीतो ते प्रत्येक वचन पूर्ण केलेले आहे, जेव्हा कलम ३७० काढण्याचे आम्ही जाहिरनाम्यात दिले होते तेव्हा काही लोक आम्हाला हसत होते, पण आम्ही कलम ३७० तर काढून काश्मिर ला देखील आपल्या राज्याप्रमाणे करून दाखविले, मोदी सरकार आल्यापासुन आम्ही सर्वच राज्यांचा समान विकास करत आहोत, आज देशातील कोटयावधी शेतक-यांना ६ हजार रूपये अनुदान खात्यात येते, आयुष्यमान योजनेतून ५ लाख रूपयांचा उपचार हा मोफत केला जातो, देशातील गरीबांना मोफत धान्य मिळत असून सबका साथ सबका विकास हाच ध्यास घेवून आमचे सरकार काम करीत असून आमचा भारत देश आता केवळ देशात आलेल्या आतंकवादयांनाच नव्हे तर बाहेरच्या देशात घुसून देखील मारतो अशी प्रतिमा निर्माण केला आहे, याचे उदाहरण आम्ही सर्जिकल स्ट्राईक, एयर स्ट्राईक जगाला दाखवून दिले असून पुढील काळात देशातील दहशतवाद संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी यावेळी नमुद केले.