दिनांक: २६ जुलै २०२२
दिल्ली: दरवर्षी २६ जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. युद्धादरम्यान भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले होते.
लडाखच्या कारगिल जिल्ह्यात आणि नियंत्रण रेषेवरील (एलओसी) इतर ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्ष झाला होता. जवळपास ६० पेक्षा जास्त दिवस ही लढाई झाली. या संघर्षात टायगर हिलचा विजय ही एक महत्त्वाची कामगिरी होती. शेवटी भारताने आपल्या सर्व प्रदेशांवर नियंत्रण मिळवले.
या लढाईत मोठ्या संख्येने जवानांनी हौतात्म्य पत्करले, तरीही भारत मातेच्या शूर पुत्रांनी तोफांचा आणि छोट्या शस्त्रांनी हल्ला सुरूच ठेवला. या युद्धात आपल्या सैनिकांचे अप्रतिम शौर्य आणि अतुलनीय निर्धार यामुळे शत्रूला भारतीय चौक्यातून मागे हटण्यास भाग पाडले. तेव्हापासून दरवर्षी २६ जुलै रोजी पाकिस्तानच्या घुसखोरीवरील विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
३ मे १९९९ रोजी कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या घुसखोरीची माहिती एका मेंढपाळाने भारतीय लष्कराला दिली होती. भारतीय हवाई दलाने २६ मे रोजी लष्कराच्या समर्थनार्थ ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत हवाई मोहीम सुरू केली. ज्यामध्ये भारतीय मिग-२१, मिग-२७ आणि मिराज-२००० या लढाऊ विमानांनी कारगिल युद्धादरम्यान रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली होती.
भारतीय नौदलाने कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानी बंदरांची नाकेबंदी करण्यासाठी, विशेषतः कराचीमध्ये तेल आणि इंधनाचा पुरवठा रोखण्यासाठी ऑपरेशन तलवार सुरू केले.
भारताला घाबरलेल्या पाकिस्तानने अमेरिकेला हस्तक्षेप करण्यास सांगितले, परंतु अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांची विनंती धुडकावून लावली आणि पाकिस्तानला सांगितले की, इस्लामाबादने नियंत्रण रेषेवरून आपले सैन्य मागे घ्यावे.
सरकारी आकडेवारीनुसार, भारताच्या बाजूने अधिकृत मृतांची संख्या ५२७ होती आणि पाकिस्तानी सैन्याची संख्या ३५७ ते ४५३ दरम्यान होती. कारगिल युद्धाचा विजय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १४ जुलै रोजी घोषित केला होता, परंतु कारगिल विजय दिवसाची अधिकृत घोषणा २६ जुलै रोजी करण्यात आली.