डॉक्टरांमध्येही असतो माणुसकीचा झरा डॉक्टरांमधील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा..!
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद हरवला असल्याने “आमचे डॉक्टर व हा माझा पेशंट” ही सुहृदय भावना अधिक रुजावी - फुलावी आणि यासाठी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकांनी प्रयत्न व्हावेत हाच माझा प्रामाणिक उद्देश - निलेश काटे
धुळे (प्रतिनिधी) डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. व्यवसायिक जगात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातही व्यवहारिक नाते निर्माण होऊ लागले आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाही संपुष्टात येऊ लागली आहे. धुळे जिल्हयात शासकीय आरोग्यसेवेची झाली आहे दुरावस्था सगळेच दाखवत असतात आणि त्यातून अनास्था निर्माण होवून डॉक्टरांवर हल्ले होतात. परंतु आज हे सर्व मागे सारत आणि या वृत्तीला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत तसेच डॉक्टरांविषयी आत्मियता दाखवत आज दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालय येथील दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचा सत्कार सत्कार करत आभार मानले. भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे देखील चांगली आरोग्य सेवा मिळते हे देखील पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
हेमंत ब्रम्हे नावाच्या युवकाचा मोठा अपघात झाला त्याच्या डाव्या बाजूच्या पायाला मोठी गंभीर दुखापत झाली व अति रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती खालावली. सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार यांचे स्वीय सहाय्यक निलेश काटे यांनी लागलीच वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्योती बागुल यांच्याशी भ्रमणध्वनीहून संपर्क करत सदर रुग्णाला दाखल केले. रुग्णाला तपासल्यावर रुग्णाचे प्राण वाचवावे कि त्याचा पाय कापावा हा प्रश्न डॉ. ज्योती बागुल यांच्या समोर उभा ठाकला. परंतु अस्थिव्यंग विभागातील प्रा. डॉ. बागुल यांनी तसेच डॉ. जितेंद्र निकुंभ, डॉ. हर्षल पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. राहुल शिंदे, डॉ. अमन मंत्री, डॉ. अभीजीत वसावे यांनी आतोनात प्रयत्न करून रुग्णाचे प्राण तर वाचविले परंतु त्याचा पाय देखील वाचवत त्याला कायमस्वरूपी अपंगत्व येण्यापासून देखील वाचविले. याच कारणास्तव आज रुग्णाची आई रंजनाबाई ब्रम्हे, विजय ब्रम्हे, गणेश जैन, निलेश काटे यांनी यासर्वांचा सत्कार करत आभार मानले. रुग्णाला MSW शरद पाटील, कृष्णा शिंदे, शरद खोंडे, संतोष चौधरी, बापु पाटील आणि वार्डातील संपूर्ण स्टाफ यांची मोठी मदत व सहकार्य लाभत आहे.
डॉक्टर आणि रुग्ण तसेच वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींमधील संवादच हरवला आहे म्हणून “आमचे डॉक्टर व हा माझा पेशंट” ही सुहृदय भावना अधिक रुजावी – फुलावी आणि यासाठी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकांनी प्रयत्न व्हावेत हाच माझा प्रामाणिक उद्देश असल्याने हा सत्कार सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार यांचे स्वीय सहाय्यक निलेश काटे यांनी घडवून आणल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले. आम्हाला विविध रुग्णांसाठी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. निर्मलकुमार रवंदळे, डॉ. अजय सुभेदार, डॉ. अरुण मोरे, डॉ. राजेश सुभेदार डॉ. परवेज मुजावर, डॉ. नीता हाटकर, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. संदीप थोरात, डॉ. रवी सोनवणे या सर्वांचे नेहमी मदत व अनमोल सहकार्य लाभते असे देखील नमूद केले.