आता कायदेशीर मान्यतेने शिवस्मारक साकारणार ; धनूर येथील ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर
धुळे (स्वप्नील मराठे) कापडणे धुळे तालुक्यातील धनूर / लोणकुटे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात अज्ञात व्यक्तींनी विना परवानगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला होता. मात्र, याला कायदेशीर मान्यता नसल्याने प्रशासनाने २७ फेब्रुवारी रोजी पहाटे सन्मानपूर्वक हा पुतळा काढला होता. दरम्यान, शासनाची परवानगी घेऊन गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सत्यभामा रोहिदास शिंदे होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचा धनूर गावात अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भात ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसेवक शरद ठाकरे यांनी पुतळा स्थापनेबाबत ग्रामसभेत सांगितले कोणत्याही प्रकारची समिती स्थापन करण्याऐवजी धनूर/लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतमार्फत शिवस्मारक स्थापनेचा विषय हाताळला जाईल.
ग्रामस्थांच्या वैयक्तिक लोकवर्गणीतून पुतळा उभारला जाईल. शिवस्मारक सुशोभीकरणासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या दहा लाख रुपये निधीच्या पत्राचे वाचन सरपंच सत्यभामाबाई शिंदे यांनी केले. ग्रामसभेला उपसरपंच माधुरी प्रवीण पाटील, सदस्य कमलबाई पटेल, युवराज चौधरी, लताबाई चौधरी, मालुबाई शिंदे, प्रज्ञा भामरे, धर्मराज शिंदे, दीपक सोनवणे, विजय चौधरी, चेतन शिंदे, पोलीस पाटील राहुल शिरसाठ, गटने शिंदे, राजेंद्र वाघ, राव कोळी, सुरेश वाघ, प्रवीण पाटील, अरुण पाटील, निंबा चौधरी, माजी सरपंच अशोक पाटील, उषा पाटील, रोहिदास पाटील, चेतन शिंदे, धनराज शिंदे, खंडेराव बोरसे, शरद शिंदे, विजय भामरे, भटू खैरनार, विनोद खैरनार, गिरधर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप शिंदे, सुनील चौधरी, लोटन पाटील, अशोक शिंदे, किरण पाटील, चिंधा सैंदा, पिंटू बोरसे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते