धुळे शहरात रेशन दुकान वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा दाट संशय ; आ. फारूक शाह यांची तक्रार !
रेशन दुकानांचे फेर जाहीरनामे काढण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश..!
धुळे (प्रतिनिधी) गेल्या वर्षभरापासून धुळे शहरातील रेशन दुकानां संदर्भात बंद व वर्ग झालेल्या स्थितीतील रेशन दुकानांचा जाहीरनामा निघावा आणि जाहीरनामा निघून रेशन दुकान हे रीतसर वाटप व्हावेत यासाठी आमदार फारूक शाह हे प्रयत्नशील होते. धुळे शहरातील नागरिकांना वेळेवर व नियमित अन्नधान्य मिळावे यासाठी देखील आमदार शाह यांनी अन्न व पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे विनंती केली होती. त्याअनुषंगाने मंत्री महोदयांनी धुळे जिल्हयात रेशन दुकान वाटपा संदर्भातील जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे आदेश पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांना दिले होते.
हा एक अत्यंत चांगला निर्णय होता परंतु यात जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी रेशन दुकान वाटप करतांना प्रचंड मनमानी केलेली असून जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे सूचनांचे पालन केलेले नाही. गरीब वस्तीत आणि मुस्लिम बहुल भागात रेशन दुकान मिळावे यासाठी अनेकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर केलेले असतांना आणि अर्जासोबत आवश्यक सर्व बाबींची पूर्तता देखील केली असतांना गरीब वस्त्यांमध्ये आणि मुस्लिम बहुल भागात एकही रेशन दुकान मंजूर केलेले नाही. रेशन दुकान वाटप झालेल्यांकडे जागा उपलब्ध नाही त्यांनी त्यात जागा असल्याचे खोटे पुरावे देखील सादर केले आहेत याचा जाब सर्व अर्जदार विचारायला गेले असता जिल्हा पुरवठा अधिकारी हे कार्यालयात भेट देत नाहीत आणि रेशन वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारी देखील मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्याकडे नागरिकांनी केलेल्या होत्या.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्यात पुन्हा लाँकडाऊन करण्यात आले. त्यावेळी शासनाने गरीब कष्टकऱ्यांची सोय व्हावी म्हणून रेशन दुकानांची संख्या वाढवून दिलेली आहे. एकूणच धुळे जिल्हयातील पुरवठा विभागाचा कारभार हा मनमानी पद्धतीने चालविला जात आहे आणि रेशन दुकान वाटपात देखील पैशांचा आर्थिक व्यवहार होऊनच रेशन दुकान वाटप वाटप करण्यात आले आहे अश्या तक्रारी आमदार फारूक शाह यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आणि खुद्द मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देखील धुळे शहरातून अश्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी मुंबई येथे छगन भुजबळ याची भेट घेत निवेदन सादर केले. त्याला उत्तर देत धुळे शहरात रेशन दुकान वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा दाट संशय असल्याने रेशन दुकानांचे पुन्हा फेर जाहीरनामे काढण्याचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.