जागतिक महिला दिनी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे २२ महिला नारी सन्मान पुरस्काराने सन्मानित
चोपडा (विश्वास वाडे) तालुक्यातील कर्तृत्त्ववान महिलांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक महिलादिनी सन्मान करण्यात आला. अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.त्रप्ती पाटील होत्या. याप्रसंगी बोलताना प्रमुख वक्त्या सौ.पुनमबेन गुजराथी यांनी आपल्या मनोगतात स्त्री ही सतत कार्य तत्परतेने आपले जीवन जगत असते, तिचा आजच महिला दिन साजरा न करता रोज महिला दिन साजरा केला तरीही कमी आहे. महिला ही समाज जीवनात सातत्याने आपले कर्तव्य पार पाडते. तिने स्वाभिमान बाळगत,अपमान सहन करण्याची क्षमता आपोआपच बाळगून वागल्याने समाज तिचा निव्वळ एक दिवस साजरा करूनही तिच्या जीवनातील उतराई करु शकत नाही, हे समाजाने लक्षात घेऊन महिलांना सतत सन्मानित वागणूकीने प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ. त्रप्ती पाटील यांनी सर्व क्षेत्रात आज महिला आघाडी वर असताना तिच्यावर बलात्कार व अत्याचार व शोषणाच्या बातम्या वाचून सामाजिक विचार किती हिन पातळीवर पोहचले आहेत, याचा विचार समाज धुरिणांनी केला पाहिजे, असे सुचवावेसे वाटते. आज संस्कार व शिक्षण यांची प्रशिक्षण दिले जाण्याची गरज असल्याचे सांगितले. महिलांना सन्मानित करण्यात ज्येष्ठ नागरिक संघाने घेतलेल्या पुढाकाराने खरा समाजाचा आशिर्वाद मिळाल्याने आज सन्मानित महिला क्रतक्रत्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहून मला स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी सत्कारार्थींतर्फे सौ.रत्ना बडगुजर यांनी मनोगतात ज्येष्ठ नागरिक संघाचे ऋण व्यक्त करित ज्येष्ठ मंडळींची हेच आमचे जीवनात ध्येय आहे, त्याकरिता सामाजिक सेवेची अभिरुची निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘आजादीका अम्रत महोत्सव’ अंतर्गत आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाद्वारा कर्तृत्ववान नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. ८ मार्च रोजी हा महिला सम्मान समारोह व पुरस्कार सोहळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या नारायणवाडी, विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या भवनात संपन्न झाला. या सन्मान पुरस्कार सोहळ्यामध्ये चोपडा तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सुरक्षा, साहस यांसारख्या विविध क्षेत्रातील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ताराबाई पाटील, नगराध्यक्ष, डॉ.त्रप्ती पाटील, पुनमबेन गुजराथी, शकुंतला गुजराथी यांच्या हस्ते पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही. एच. करोडपती, उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, सचिव प्रमोदनाना डोंगरे आणि महिला विभागप्रमुख शंकूतलाबेन गुजराथी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
पुरस्कार व सन्मानित महिला नेत्री
ललिता रमेशसिंग परदेशी (आरोग्य सहायिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले), मिना गोरख पाटील (अंगणवाडी सेविका, घुमावल बु.), योगिता हरी न्याहळदे (अव्वल कारकून, तहसील कार्यालय, चोपडा), कु.हेमांगी विनोद शुक्ल (समाजसेवी युवती), छाया अरविंद गुजराथी (समाजसेवी कोरोना योध्दा), रत्ना पंढरीनाथ बडगुजर (महिला होमगार्ड, चोपडा युनिट), वैशाली मधुकर पाटील (तलाठी, मंगरूळ, ता. चोपडा), मनीषा खुमानसिंग बारेला (तलाठी, वडती, ता. चोपडा), रत्नमाला हंसराज शिरसाठ (महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, चोपडा), अनिता विलेश सोनवणे (स्टाफ नर्स, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा), विमलबाई भिल (वर्डी, ता. चोपडा), पल्लवी रुपेश नेवे (महिला पोलीस, ग्रामीण पोलीस स्टेशन, चोपडा), हेमलता महेंद्र पाटील (तलाठी, गरताड, ता. चोपडा), भावना अरुण सांगोरे (फॉरेस्टर, सामाजिक वनीकरण विभाग, चोपडा), प्रतिभा आबाजी पाटील (अंगणवाडी सेविका, मजरेहोळ, ता. चोपडा), लक्ष्मीबाई राजेश पालिवाल (समाजसेविका, चोपडा), सुनिता तेरसिंग बारेला (आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागलवाडी, ता. चोपडा), मंगला प्रताप निकुंभे (आशा वर्कर, चोपडा) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी धर्मवीर अहिल्याबाई होळकर,महिला शिक्षणाच्या प्रणेत्या कै.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पण कार्यक्रम व दिपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष व मान्यवरांच्या शुभहस्ते घोषित सर्व पुरस्कार्थींचे पुरस्कार स्मृती चिन्ह, सन्मान पत्र ,व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. प्रस्तावना ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष विजय करोडपती यांनी तर स्व.सानेगुरुजींची मानवप्रार्थना नेरपगारेसर यांनी सादर केली. सुत्रसंचालन प्रा.आशाताई वाघजाळे, व प्रदर्शन अनिलकुमार पालीवाल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आभार सचिव प्रमोदनाना डोंगरे, उपाध्यक्ष एम्.डब्ल्यू. पाटील, एन् डी.महाजन, जयदेव देशमुख,आदी सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप एन्.डी.महाजन यांनी पसायदान सादरीकरण करून केला. याप्रसंगी मधुकर बाविस्कर गुरुजी, डॉ.शेखर वारके, मालतीबाई मराठे,माजी नगरसेविका राधाबाई देशमुख, डॉ. राजेंद्र पालीवाल, प्रा.रमेश वाघजाळे, महिला सदस्य कुंदा डोंगरे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला अध्यक्षा शकुंतला गुजराथी, आदी मान्यवर उपस्थित होते.