अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्र्यांनी घेतला आढावा
नोडल एजन्सीमार्फत पर्यटनविषयक कामाला प्राधान्य देवून पायाभुत सुविधा पर्यटनस्थळी उपलब्ध करुन देणे गरजेचे - आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित होत्या.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, नोडल एजन्सीमार्फत पर्यटनविषयक कामाला प्राधान्य देवून प्राथमिक स्वरुपातील जमीन, रस्ते, बसस्टॉप, वीज, पाण्याची टाकी, माहितीफलक, स्वागत कमानी, विद्युतीकरण या पायाभुत सुविधा पर्यटनस्थळी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अष्टविनायक ट्रस्टला विश्वासात घेवून काम करावे. तसेच अष्टविनायक आराखडा निधीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, अष्टविनायकसंदर्भातील दोन प्रस्ताव नियोजित आहेत. यापैकी मुलभूत सुविधा देण्यासंदर्भात ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दुसरा प्रस्ताव सुशोभिकरण, व्हीआयपी पास, उपहारगृह, यात्री निवास, वाहनतळ, भक्तनिवास याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी १३० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या आराखड्यासाठी ऐकूण २४२ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. ‘प्रसाद’ योजनेंतर्गत अनेक कामे प्रस्तावित असून या कामाला एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल.
नवीन कामांचे प्रस्ताव आले आहेत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी दिले. पर्यटन विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पर्यटन, नगरविकास, ग्रामविकास या विविध विभागाकडून प्रभावी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.