धुळे शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा ; आ. फारूक शाह यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन !
शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश वजा आश्वासन !
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरात व देवपूर भागात अवैध धंदे जोमाने सुरु झाले असून या आठवड्यात सर्वसामान्य जनतेकडून व काही सुज्ञ व सुशिक्षित नागरिकांकडून चोऱ्यांचे वाढते प्रमाण, चैन व मंगळसूत्र हिसकावून पळणे, मटक्याचे धंदे, तीन पत्ती जुगार, झन्नामन्ना, सट्टापिढ्या, अवैध दारू विक्री यासारखे अवैध धंदे सर्रासपणे सुरु असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात १०० फुटी रोडवर व काही इतर ठिकाणी नशेच्या गोळ्यांची होत असलेली विक्री त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे.
महाविद्यालय परिसरात महिला व युवतींना होत असलेल्या छेडखानीच्या प्रकारामुळे महिलांमध्ये पसरत असलेली असुरक्षिततेची भावना, वाढती गुंडगिरी यावर पोलीस प्रशासनाचे पुन्हा एकदा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच शिरपूर तालुक्यातील चारण मोहल्ला येथे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील मोठा जुगार अड्डा बिनधोक पणे चालविला जात आहे. तसेच शिरपूर तालुक्यात बनावट मद्य बनविण्याचा कारखाना नाशिक उत्पादन शुल्क विभागाने उध्वस्त केला होता. त्याची खबर स्थानिक पोलीस प्रशासनाला नव्हती तसेच या भागात मोठ्या प्रमाणात केमिकलचा बेकायदेशीर व्यापार चालू आहे.
धुळे शहरात प्रभाकर टाँकीज आणि राजकमल टाँकीजच्या परिसरात, वडजाई रोड एकता हॉस्पिटलजवळ, मुल्लावाडा, ज्योती टाँकीज जवळ, मनोहर चित्र मंदिरा समोरील मनपा कॉम्प्लेक्सच्या परिसरात, रथ गल्ली गल्ली क्र. ४ जवळ मोठ्या प्रमाणात सट्टा व रनिंग मटका सुरु असून वरील सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टापिढ्या सुरु आहेत. तसेच अन्वर नाल्यावर व आग्रारोड वरील सात ताली बिल्डींगच्यामागे, हॉटेल चंद्रलोकच्या वरती, नटराज टाँकीज परीसरात यासर्व ठिकाणी जुगार, तीन पत्तीचे क्लब व झन्नामन्ना देखील सुरु आहेत. जिल्हयात दररोज अवैध मद्य साठा व गांजा शेती विशेषतः शिरपुर तालुक्यात पकडली जात असल्याचे वृत्त दररोज वर्तमानपत्रात छापुन येत आहे. शहरात किरकोळ कारणावरून भांडणाचे प्रकार वाढत आहे. वाढत्या गुंडगिरीवर तसेच मटक्याचे धंदे जुगार, अवैध दारू, चोऱ्या-चपाट्या, सार्वजनिक ठिकाणाहून मोटर सायकली लंपास होणे, मोटर सायकलवर ट्रिपल सिट फिरणे इत्यादी बाबींवर पोलिसांचे अजिबात नियंत्रण नाही.
वाहतुक व्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा, अनेक प्रमुख चौकात वाहतुकीचा होत असलेला खोळंबा आणि त्याकडे पोलीस प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष हि बाब निश्चितच प्रशासनाच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही. वरील सर्व गंभीर बाबींकडे आपण वैयक्तिक लक्ष घालून सर्रासपणे सुरु झालेल्या सर्व अवैध धंद्यावर आणि सदरच्या अवैध धंद्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा तात्काळ कठोर स्वरुपाची कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले. यावर मंत्री वळसे पाटील यांनी तात्काळ अवैध धंदे बंद करण्याबाबतचे आदेश व आश्वासन आमदार फारुक शाह यांना दिले आहे.