नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा कायम
मुंबई (प्रतिनिधी) आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु राणेंना अटकेपासून संरक्षण कायम ठेवलं आहे. सोमवार, १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे सोमवारी या प्रकरणावरी सुनावणी होणार असून याच दिवशी निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सिंधुदुर्गात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये भाजपा आमदार नितेश राणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. म्हणूनच राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. यावर गुरुवारी (१३ जानेवारी) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय. हा निर्णय सोमवारी (१७ जानेवारी) सुनावण्यात येणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने नितेश राणेवर कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे.
याआधी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत नितेश राणेंचं नाव देखील आलं आहे.
या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन दिवसांच्या सुनावणीनंतर तिसऱ्या दिवशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात नितेश राणेंच्या वकिलांनी माहिती दिली आहे.