जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी थेट एलॉन मस्कला धाडलं आमंत्रण, म्हणाले..
मुंबई (प्रतिनिधी) इलेक्ट्रिक कार निर्मितीत आघाडीवर असलेल्या टेस्ला कंपनीचा प्रकल्प उभारण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यात भारतही मागे नाही. पण काही आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे ट्विट कंपनीचा सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी नुकतंच केलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत मस्क यांना राज्यात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असंही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुप्रसिद्ध टेस्ला कारचं लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न ट्विटरवरील एका युजरने एलोन मस्कला विचारला त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचे मस्क याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, तुमच्या उभारणीसाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलोन मस्कला महाराष्ट्रात आमंत्रित केले आहे.