शिंदखेडा येथे उद्या राज्य स्तरीय भिल महासंमेलन विविध कार्यक्रम आयोजित
शिंदखेडा (यादवराव सावंत) महाराष्ट्र राज्य भिल समाज विकास मंच आयोजित उद्या अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता विरदेल रोड साईलीला नगर येथील भव्य पटांगणावर महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास मंत्री ना.के.सी.पाडवी यांच्या हस्ते महासंमेलनाचे उदघाटन होणार असून अध्यक्ष स्थानी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. सिमाताई वळवी तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री पदमाकर वळवी व माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार गावित उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या तीन महिन्यापासुन अथक प्रयत्नाने भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक राज्य स्तरीय भिल महासंमेलन शिंदखेडा( जि.धुळे ) उद्या अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे. भव्य दिव्य पटांगणावर महा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. महासंमेलन सभामंडप , भोजन कक्ष , मोटार वाहन पार्किंग , विविध साहित्य विक्रीसाठी स्टालची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून राज्य स्तरीय पहिले भिल महासंमेलनाचे उदघाटन आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी तर जि.प.अध्यक्षा अॅड.सिमाताई वळवी अध्यक्ष स्थानी राहणार आहेत तसेच विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री पदमाकर वळवी व आमदार विजयकुमार गावित शिवाय राकेश जमानेकर ( अभियंता , धुळे ) , रेणुका गुलाबसिंग सोनवणे (दोंडाईचा ) डोंगरभाऊ बागुल (सचिव आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य), प्रमुख वक्ते म्हणून सांगल्याभाई वळवी (गुजरात),सुहास नाईक( जि.प.सदस्य नंदुरबार) ,दिलीप मोरे ( आदिवासी नेते बुलढाणा ) सुनील गायकवाड (कवि साहित्यिक चाळीसगाव) , प्राचार्य डाॅ. नानासाहेब गायकवाड (सिनेट सदस्य जळगाव) ,जयाजी सोनवणे (आदिवासी एकता परिषद, जळगाव , कु. भाग्यश्री मोरे (मा. सरपंच, पी.एच.डी.अॅपी. मुम्राबाद )आदी वक्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.त्यात पुढील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे .संमेलनातील विषय-1) महाराष्ट्रातील भिल समाजाला विखुरलेला एका मंचावर आणणे. 2) महाराष्ट्रातील भिल समाजाचे नेतृत्व राजकीय , सामाजिक क्षेत्रात संविधानिक अधिकार लोकसंख्येनुसार मिळावे.3) महाराष्ट्रातील भिल समाजामध्ये शिक्षणाची जागृती करून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. 4) भिल समाज व्यसनमुक्त व समाज जनजागृती करणे. 5) अन्न , वस्त्र ,निवारा या संविधानिक अधिकारावर महाचर्चा 6) स्वावलंबन व स्वाभिमानी भिल समाजाला जागृत करणे. 7) महाराष्ट्रातील कानाकोपरातील शहर व ग्रामीण भिल वस्त्या म्हणजे भिलाटयास नियमाकुल करणे. 8) आदिवासी विकास विभागाने भिल समाजासाठी स्वतंत्र निधी विशेष आर्थिक पॅकेज उपलब्ध करून देणे. 9) धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात शहर व ग्रामीण भागातील तसेच शिरपूर व शहादा तालुक्यातील गावांना पेसा अंतर्गत मध्ये समावेश करणे आदी विषयांवर मार्गदर्शन व महाचर्चा होणार आहेत. यातुन महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेऊन भिल समाजातील व्यथा निदर्शनास आणून देण्याचा मानस आहे. तत्पूर्वी आज रविवार दहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
यात सुरवातीला भिल समाजातील शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या युवा युवती कलावंत यांचा गौरव तसेच देशात सेवा देवुन घरी सुखरुप परत आलेल्या व तालुक्यात खान्देश रक्षक संस्था ही नेहमीच सुख दुखात सदैव तत्पर असणारी माजी सैनिकांचा विशेष गौरव सोहळा बरोबर संमेलन स्थळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत होणार आहेत. त्यानंतर मालेगाव , नाशिक , धुळे , नंदुरबार , जळगाव , शहादा , शिरपूर . कडवण बागलाण , शिंदखेडा येथील कलावंत आपल्या आदिवासी कलेत आकर्षक वेशभूषेत आदिवासी नृत्य ,बासरी गायन यासह तरुण तरुणी सदाबहार मेजवानी प्रेक्षणीय ठरणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाकडुन केले आहे. दोन दिवसात शिंदखेडा येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार असून चांगल्या विविध विषयांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण समाजाला मिळणार आहे. सदर ऐतिहासिक भिल महासंमेलनासाठी महाराष्ट्रातील बीड , जालना , औरंगाबाद , मुम्राबाद ,बुलढाणा , नाशिक . वणी , कडवण , बागलाण , सटाणा , जळगाव , चाळीसगाव , एरंडोल , चोपडा , धुळे , नंदुरबार , शहादा . शिरपूर या सह महाराष्ट्रातील कानाकोपरातील समाज बांधव सह मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील ही समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.संमेलन यशस्वी करण्यासाठी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
भिल समाजातील जनजाती महाराष्ट्र राज्यात मोठय़ा प्रमाणावर असुन सर्व समाजाला एका मंचावर आणुन विचाराची देवाणघेवाण तसेच समाजातील व्यथा शासनाच्या लक्षात आणण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून भिल महासंमेलन घ्यावे हे माझ्या डोक्यात संकल्पना होती.मात्र कोरोणा काळात दोन वर्षे अशीच वाया गेली.अखेर आज तो दिवस उगवला.हयाचा मनस्वी आनंद झाला आहे. हे संमेलन पार पडत असताना माझ्या एकटयाचे श्रेय नसुन माझ्या तळागाळातील कार्यकर्तेयांनी तीन महिन्यापासुन अथक परिश्रम घेतले आहे.खरे श्रेय त्यांना जाते.
दिपक अहिरे, संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य