महाराष्ट्रविशेष

शिक्षणाच्या गावातील “विश्वास” हरपला !

शेवाळी (किरण नांद्रे) स्वातंत्र्य दिनाच्या स्मृती चा जागर जाणिवांचा उत्सव साजरा करतांना आज भल्या पहाटे शेवाळी ग्रामस्थांच्या भावनेला नियतीने थेट आव्हान दिले. नियती जिंकली शेवाळीकर हरले. आदर्श शिक्षक आप्पासाहेब विश्वासराव सुखलाल जाधव उपाख्य व्ही एस जाधव यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आजारपणात तीव्र दुःखद निधन झाले. म्हणाल तर शेवाळी गावाच्या नेत्रदीपक शैक्षणिक युगाचा अस्त झाला आहे.

एक पुरोगामी विचारांची ज्योत आयुष्यभर तेवत ठेवणारे जाधव कायमच खादिधारीत धीरगंभीर न्यायनीतीने चारित्र्यवान राहीले. त्यांच्या ४० वर्ष शैक्षणिक वाटचालीत आणि ७५ वर्षांच्या शेवाळीचे जबाबदार नागरिक गावकर्मी भूमिपुत्र म्हणून गावाची सेवा करतांना त्यांनी सेवेची सर्वच अंगे लक्ष लक्ष लक्षवेधी केली. जीवशास्त्र रसायनशास्त्र गणिताचे ते शिक्षक होते त्याबरोबरच ते एक लोकशिक्षक समाज शिक्षक होते. राष्ट्र सेवा दलाच्या विचारांनी प्रेरित होऊन विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासून युवकांच्या वैचारिक कक्षा आणि आवाका लक्षात घेऊन सर् नेहमीच वास्तववादी मार्गदर्शक ठरले.एक पारदर्शक निरपेक्ष वृत्तीने निःपक्षपातीपने ते शिक्षक म्हणून सतत झडत राहिले. जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच एक लाभण्यासाठी मोठा नशिबाचा ठेवा असावा लागतो तो सुवर्ण योग त्यांच्या नशिबी होता विषेश म्हणजे त्यांनी सर्व संधीचे सोनेच केले.

विद्यार्थी हितासाठी घडवण्यासाठी या प्रामाणिक शिक्षकाला रडीचा डाव कधी खेळता आला नाही हे वेगळेपण फक्त जाधव सरांच्या व्यक्ती महत्वामध्ये अनुभवता आले. जाधव सर एका अर्थाने शैक्षणिक क्षेत्रातील धगधगता निखारा होते. शालेय शैक्षणिक वाटचालीत कला, क्रीडा, साहित्य विज्ञान, तंत्रज्ञान, प्रयोग , साने गुरुजींच्या कथामाला, छात्र भारती, विज्ञान प्रदर्शन,शाळा सजावट, राष्ट्रिय सण उत्सव साजरा करणे असेल, राष्ट्र भक्त देश भक्तांचे स्मृतिदिन साजरा करणे असेल, सर्व प्रकारच्या कवायती सराव, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी निमीत्ताने सांस्कृतीक कार्यक्रम आयोजनातील सरांचा सहयोग हवा हवासा वाटणारा होता.

शालेय जिवनात विदयार्थी हिताला प्राधान्य देताना विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची पालकाची आर्थिक कुवत कौटुंबिक पार्श्वभूमी ह्या असल्या बारीक सारीक बाबी विचारात घेऊन सर विद्यार्थी संवाद घडवायचे त्यामुळे कधीही आर्थकदृष्टया कुचंबणा होईल अशी मागणी लावुन धरत नसे. टाकाऊ पासून टिकाऊ, कपडे फाटके असु शकतात पण स्वच्छ असावेत असा आग्रह त्यांचा असायचा, वह्या जुन्या फाटक्या असू शकतात पण त्या होमवर्क परिपूर्ण असाव्यात, आरोग्य बाबत विद्यार्थ्यांचे केसांचा नखांचा नेहमी समाचार घेत असत. वय वजन उंची लसीकरण या बाबतीत ते पालकांना मार्गदर्शन करीत स्कॉलरशिप परीक्षा विवीध शिबिरात विद्यार्थ्यांना सहभागी ते सातत्याने करण्यासाठी प्रयत्नशील असायचे.

सेवादलाच्या हर एक शिबिरात आणि कार्य समारंभात सर हजरच हजर राहीले आणि त्यांच्या दिमतीला शेवाळी गावातली सहकारी शिक्षक मंडळी सातत्याने सहयोगी राहीले. प्रा. माधव वझे, बा य परीट गुरुजी, प्रकशभाई मोहाडीकर ,नानासाहेब जयवंतराव ठाकरे, आर एम भोसले सर, आप्पासाहेब बेडसे, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रा एम बी शाह, एल जी सोनवणे, प्रा पैठणे, प्राडॉ श्रीपाल सबनीस अशा अनेक कर्मयोगिंच्या विचाराची आयुष्य भर या माणसाने पूजा बांधली.पुरोगामी सर्वोदयी दूरगामी विज्ञानवादी विचार गावातील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावेत यासाठी सर् नेहमीच आग्रही असायचे प्रसंगी पदरमोड करून त्यांनी अनेक वीख्यात व्याख्यात्यांचे शेवाळीत अनेक विषयावर यशस्वी व्याख्याने आयोजित केली.

रात्रीचे शिकवणी वर्ग, शाळेच्या वेळे व्यतिरिक्त आगाऊ मोफत शिकवणी वर्ग ही संकलपणा ही जाधव सर त्यांची सहकारी मंडळी एस बी नाना, एम एन दादा पाटील, स्व बी बी दादा पाटील, स्व आर एम नांद्रे, स्व एस एन कुवर, टी बी साळुंके, आदींची ही गुरुकिल्ली उभ्या ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षण व्यवस्थेला दिली आहे.हे सत्य नाकारून चालणार नाही. स्काऊट गाईडची शिस्त सरांच्या रोमारोमात ठासून भरलेली होती.डाव्या विचारांचे पाईक असलेले सर नेहमीच पुरोगामी सर्वोदयी जगताना पाहिले त्या बरोबरच उजव्या विचारांचे लोकनेते माजी मंत्री जनसंघाचे नेते स्व नानासाहेब उत्तमरावं पाटील यांच्या व्यक्तिमत्वावर सर आयुष्यभर प्रेम व्यक्त करीत राहिले. या माणसाने आयुष्य जगताना कोणा व्यक्ती विषयी किंवा गटा विषयी पूजा बांधली नाही ना तिरस्कार केला नाही.

अजातशत्रू म्हणुन ते अमर राहतील.गावाच्या राजकारणात सरांनी कधीही डोकावून पाहिले नाही मात्र काम करणाऱ्याला संधी मिळावी असे समर्थन नेहमी करत राहिले. एका शिक्षकाने समाजात कसे रहावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सरांकडे पाहता येईल. आज राज्य देशात देशाबाहेर त्यांचा मोठा विद्यार्थी वर्ग कार्यरत आहे. समाजभान असलेल्या आणि निगर्वी प्रामाणिक अभ्यासू वृत्ती असलेल्या शिक्षकाला समाज मुकला असे म्हणणे सोपे जरी असले पण व्यवस्थेतील भ्रष्ट नोकरशाही व सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या खुज्या महाठगांच्या नाकर्ते पणा समोर जाधव सर सारखे योग्यता लाभलेले शिक्षक पुरस्कारासाठी कधीही झुकले नाहित. म्हणून योग्यता लाभलेले शिक्षक पुरस्कार पासून नेहमीच वंचित राहीले. आता प्रश्न आहे शेवाळीकरांच्या मानसिकतेचा यापूर्वी आर एम नांद्रे गेले, बी बी दादा , एस एन कुवर गेले, आता व्हीं एस जाधव सर गेले यांच्या जाण्याने हा धक्का शेवाळी ग्रामस्थांच्या दृष्टीने आणि हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या मनात मोठी कळ उठलेली आहे.

लोकविलक्षण प्रभाव ह्या शिक्षक मंडळीने जनमानसावर निर्माण केला होता त्याला कारणही तसेच होते या मंडळींनी कृती उक्तीत कधी फरकही दिसू दिला नाही.सर्व ग्लॅमरस जगणे बाजूला सारून गावाला प्राधान्य दिले.शहरातील गगनचुंबी इमारतीत राहण्या पेक्षा गावातली माती शेती शैक्षणिक प्रगती उभी करण्यात धन्यता मानली.आता ह्या परोपकारी वृत्ती चा पुरस्कार करणाऱ्या महत्प्रयासने जीवन समर्पित करणाऱ्या शिक्षकांची ऊर्जा कोण भरून काढेल.ही भावनीक भूक कोण पूर्ण करेल हा खरा प्रश्न आहे अनुत्तरीत आहे. यात शेवाळी गावातील अनेक लोक शिक्षण क्षेत्रात व प्रशासनात अधिकारी कर्मचारी पत्रकारिता सेवा कार्यात आहेत त्यांनी आपल्या जाणिवा प्रगल्भ करून गावाविषयी व्यापक विचार करून निरपेक्ष भावनेने विधायक दृष्टिकोन जोपासून युवकांचे वैचारिक मंथन केले पाहिजे व गाव विकासाची दृष्टी धरून कृतीशील झाले पाहिजे तीच खऱ्या अर्थाने जाधव सरांना श्रध्दांजली होऊ शकते.

हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या पोटात सरां विषयी ओतप्रोत प्रेम आणि आदरयुक्त दरारा भरलेला आहे. सरांच्या अकाली एक्झीटने शेवाळी गावासह ग्रामीण शैक्षणिक वाटचालीचे मोठे नुकसान झाले आहे मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे.सरांच्या अचानक निघून जाण्यामुळे आठवणींचा जाणीवांचा जागर करतांना हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या मनात आज खोलवर जखम झाली आहे ती कधीही न भरून निघण्यासाठी ….. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो ही माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या तर्फे अखेरचा सलाम … भावपूर्ण आदरांजली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे