माणुसकीचा झरा आजही जिवंत ; दोन तोळे सोन्याचे गंठण केले कोंडबा डोंगरे यांनी परत
ठाणेदार प्रताप भोस यांनी केला शाल व श्रीफळ देऊन सन्मान
ढाणकी : असे म्हणतात की, हे जग आजही चांगल्या लोकांच्या भरोशावर चालत आहे. आणि ते खरेही आहे त्याचा नुकताच प्रत्यय ढाणकी शहराला आला असून फुलसावंगी फाटा येथे छोटीशी चपलाचे दुकान चालवणारे व आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणारे कोंडबा मारुती डोंगरे यांनी पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेल्या वंदना रवी चव्हाण यांचे दोन तोळे सोन्याचे गंठण परत केल्याने त्यांचे ढाणकी शहरात कौतुक होत आहे.
घरगुती कार्यक्रमासाठी पोफाळी येथे कार्यरत असलेल्या वंदना चव्हाण हे आपले पती व मुलासोबत ढाणकी पासून जवळ असलेल्या अकोली येथे आल्या होत्या. कार्यक्रमात बराच वेळ बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे त्याची आजची किंमत अंदाजे एक लाख 13 हजार रुपये असलेले गंठण कुठेतरी पडले आहे. त्यांनी ही बाब तात्काळ त्यांच्या पतीच्या लक्षात आणून दिली. दोघेही पती-पत्नी त्या गंठणाचा शोध घेत होते . पहात पहात दोघेही अकोली पासून फुलसावंगी फाटा येथे आले असता तिथे उपस्थित असलेल्या बाळू बुटले व सुनील कदम यांनी यांचे काही तरी हरवले हे ध्यानात घेतले व त्यांनी त्याला धीर दिला व तुमचे सोने सुरक्षित आहे अशी हमी दिली. त्यानंतर कोंडबा डोंगरे यांनी हे गंठण ठाणेदार प्रताप भोस यांच्या स्वाधीन केले. ठाणेदार यांनी शहानिशा करून वंदना रवी चव्हाण यांना व्यापारी अतुल येरावार, गणेश नरवाडे, उत्तम रावते यांच्या उपस्थिती मध्ये परत केले व शाल श्रीफळ देऊन कोंडबा डोंगरे यांचा येथेच्छ सन्मान केला.
अत्यंत नाजूक परिस्थिती असलेल्या डोंगरे यांनी आजच्या काळात सुद्धा इमानदारी दाखवल्याने खरंच हे जग अशा लोकांच्या भरवश्यावर चालत आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. यावेळी उपनिरीक्षक कपिल मस्के, पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.