महाराष्ट्रराजकीय

“मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची” अशी अवस्था फडणवीसांची झालीये ; संजय राऊतांचे टीकास्त्र

मुंबई (वृत्तसंस्था) आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका फडणवीस यांनी केली होती, यावरच प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“नटसम्राट हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव आहे आणि गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा असल्याचं त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातील सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्यातील जनतेचा, रसिकजनांचा आणि नाट्यकर्मींचा अपमान करत आहेत,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “नाटकात कोणी घर देता का घर असं एक वाक्य आहे. तशीच फडणवीसांची मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी अवस्था आहे”.

“नटसम्राट म्हणाल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. गोव्याने मराठी रंगभूमी संपन्न केली. नटसम्राट म्हणाल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

मनोहर पर्रिकरांसंबंधी संजय राऊत यांनी आजारी असताना केलेल्या उल्लेखाची आठवण करुन देताना मगरीचे अश्रू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “तेव्हा पर्रिकर सक्रीय नव्हते. याचा अर्थ त्यांच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना व्हावी अशी आमची भूमिका नव्हती. आम्ही इतके निर्देयी नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपाचा प्रश्न आहे. पण जर ते अपक्ष राहिले तर त्यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याबाबत विचार केला पाहिजे. शिवसेना नक्की विचार करेल”.

“पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. याच्या पलीकडे भाजपाच्या यादी, उमेवारांशी किंवा निवडणुकीशी काही संबंध नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवावी,” असंही ते म्हणाले. “गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकू विधानसभेकडे चालली आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू. आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचं स्थान असेल,” असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात भाजपा आणि आम्ही एकत्र असताना गोव्यात नव्हतो असं सांगत त्यांनी काँग्रेस सोबत नसल्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

नगरपंचायत निवडणूक निकालावर बोलताना ते म्हणाले की, “भाजपा क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजपा पहिल्या क्रमांकावर असून नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचं स्थान कायम ठेवल्याबद्दल अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढच राहा अशा मी शुभेच्छा देतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल आणि ही बेरीज बरीच पुढे आहे”.

“शिवसेना हा प्रामुख्याने शहरी भागातील पक्ष आहे. राष्ट्रवादीने जास्त जागा लढवल्या असतील. मुंबई, ठाणे, पुणे या भागात नगरपंचायती झाल्या नाहीत, पण जिथे झाल्या तिथे शिवसेना लढली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे. पण यापुढील अनेक वर्ष महाविकास आघाडी म्हणूनच बेरीज करावी लागेल,” असं राऊतांनी सांगितलं. “भाजपा नेते काहीही म्हणतील, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे,” असंही ते म्हणाले.

“आम्ही महाविकास आघाडी म्हणून निकालाकडे पाहत आहोत. राज्यात एकत्र सरकार चालवताना एकमेकांचं बोट धरुन चालत आहोत, त्यामुळे तसंच पाहावं लागेल. या निवडणुका खूपच तळागाळात होत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे उद्या काय होईल या दृष्टीने पाहणं गरजेचं नाही. भाजपासोबत असतानाही असाच निकाल येत होता. पण विधानसभा, लोकसभा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही यावर गांभीर्याने विचार करतो. स्थानिक निकालावर तेथील नेते बोलतील,” असं संजय राऊत म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे