राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
फुलंब्री (विवेक महाजन) बोरगाव अर्ज ता. फुलंब्री येथील परिसरातील गरजू व पात्र विद्यार्थ्यांना महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. आज गुरुवार रोजी बोरगाव अर्ज येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. जि.प.चे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नती व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवित आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आज २७ पात्र व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. शासनाच्या या लाभामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
या योजनेपासून वंचित राहिलेले पात्र व गरजू विद्यार्थ्यांना शासनाकडून तसेच सामाजिक बांधिलकीतुन स्वखर्चाने सायकल उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांना केले.
कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, तारूअप्पा मेटे यांच्यासह बोरगाव अर्जचे सरपंच शिवाजी खरात, गेवराई गुंगी चे सरपंच शिवाजी डकले, अडगाव चे सरपंच रामदास जोनवाल, सोसायटीचे चेअरमन पंडित सुस्ते, कचरू पा. साबळे, पंडित पवार, प्रदीप गाडेकर, रामदास बांबर्डे आदींसह गावकरी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
किशोर बलांडे यांनी वडोदबाजार गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे खेचून आणली. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बलांडे यांना या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधी कमी पडू दिला नाही असे स्पष्ट करीत सर्वोत्कृष्ट सदस्य निवडण्याची संधी मिळाली तर किशोर बलांडे यांचा सर्वोत्कृष्ट सदस्य म्हणून गौरव करेल अशा शब्दांत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी किशोर बलांडे यांच्या कामाचा गौरव केला.