अजिंठा घाटातील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवार (दि.२०) रोजी अजिंठा घाटात सुरू असलेल्या औरंगाबाद – जळगाव महामार्ग रस्ता कामाची पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान येथील सततची होणारी वाहतूक कोंडी व रस्त्याचे होत असलेले अरुंद काम पाहून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
महामार्गाच्या नियमानुसार व ठरलेल्या अधिकृत हद्दीपर्यंत रस्त्याचे काम करावे जेणे करून रस्ता अरुंद न होता रस्त्याची रुंदी वाढेल, रस्त्याच्या एक बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम करावे, या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता घाटातील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, महामार्ग प्राधिकरण मंडळ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समनव्ययाने अजिंठा घाटात सोयीस्कर रस्ता कसा होईल यासाठी प्रयत्न करणे तसेच काम करीत असतांना वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता डी. एन. थोरात, कनिष्ट अभियंता सागर कळम , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे आदींची उपस्थिती होती.



