‘आदिवासी कवितेत आहे परिवर्तनाचा हुंकार’ : प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर (आदिवासी साहित्य अभ्यासक व मराठी विभाग प्रमुख बी. डी. काळे महाविद्यालय, घोडेगाव, पुणे) यांचे ‘मराठी आदिवासी साहित्य व विद्यार्थी’ या विषयावर ‘ऑनलाईन व्याख्यानाचे’ आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एन. सोनवणे ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी एम.टी.शिंदे, डॉ. ए.बी.सूर्यवंशी, प्रा. संदीप भास्कर पाटील (समन्वयक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्र, चोपडा), व्ही. पी. हौसे, जी. बी.बडगुजर आदि ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर ‘मराठी आदिवासी साहित्य आणि विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘कविता हा आदिवासी साहित्यातील महत्वाचा साहित्य प्रकार आहे. आदिवासी कवितेत शाळा, आश्रमशाळा यांमध्ये शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणी, समस्या व प्रश्न,कोरोना काळातील आदिवासी शाळकरी मुलींचे प्रश्न, आदिवासी मातेचा आक्रोश, व्यथा, वेदना, विद्रोही व नकार यांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. वीर एकलव्य हेच आदिवासी साहित्याचे प्रेरणास्रोत आहेत. आदिवासी कवितेत परिवर्तनाचा हुंकार आहे. आदिवासी कवितेतील विद्यार्थी सुधारणावादी, परिवर्तनवादी व बंड पुकारणारे आहेत.याप्रसंगी त्यांनी कवी भुजंग मेश्राम यांच्या ‘तानाजी श्रीराम’, ‘भीमराव भोईनवाड’, ‘लहाण्या शिंगण्या’, कवी माधव सरकुंडे यांच्या ‘शाळकरी मुलींचे प्रश्न’, कवी डॉ. सखाराम डाखोरे यांच्या ‘रानवा’, कवी हनुमंत भवारी यांच्या ‘सपान’, कवयित्री शीतल ढगे ‘रानफुल’ कवी वसंत कनाके यांच्या ‘शिक्षण’, कवयित्री कविता आत्राम यांच्या ‘काजवा’ तसेच डॉ. विनायक तुमराम संपादित ‘शतकातील आदिवासी कविता’ इत्यादी कवींच्या ग्रंथांमधील आदिवासी विद्यार्थ्याने पुकारलेले बंड, त्याच्या व्यथा, वेदना यांचे कवितेतून प्रतीबिंबीत होणारे चित्र स्पष्ट करून सांगितले. यावेळी त्यांनी आजच्या आदिवासी या संशोधकानी ‘आदिवासी साहित्यातील आई, बाप व विद्यार्थी’ या विषयांवर संशोधन करावे असे आवाहन उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘आदिवासी विद्यार्थ्यांचे होणारे शोषण थांबले पाहिजे. आजचा आदिवासी विद्यार्थी शहरात येऊन शिक्षण घेतो, त्याला त्यामुळे समाजभान प्राप्त झाले आहे ही महत्वपूर्ण बाब आहे.आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी तसेच साहित्य संशोधनाविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन डॉ. एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार प्रा. संदीप भास्कर पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, आदिवासी संशोधक, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी ऑनलाईन उपस्थित होते.