शिंदखेडा येथे रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम
शिंदखेडा (यादवराव सावंत) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे रुग्णउपयोगी साहित्य सेवा केंद्राचे आज पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णांची आता चांगली सोय होणार आहे. गरजू रूग्णांना होल्डिंग वाकर, व्हील चेअर, वाकिंग स्टिक, कुबड्या, फाऊलर बेड,कमोड चेअर, एअर बेड, वाटर बेड, ऑक्सिजन कॉन्शनटेटर आदी साहीत्य केवळ अमानत रक्कम भरून ठराविक कालावधीसाठी वापरायला मिळणार आहे. येथिल वीर सावरकर पतसंस्थेत हे साहित्य उपलब्ध असेल. जनतेच्या सेवेसाठी असलेल्या या उपक्रमाला इच्छुकांनी देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत याच कार्यक्रमात हर्षल कालिदास देसले, डॉक्टर देवेंद्र पाटील, प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी देणगी स्वरूपात मदत जाहीर केली.
महाराष्ट्रात गेली 49 वर्षांपासून जनकल्याण समितीचे काम सुरू आहे. दुष्काळ विमोचन समिती या नावाने 1972 मध्ये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सूरू झालेल्या कामातून जनकल्याण समितीची स्थापना करण्यात आली. रुग्ण उपयोगी साहित्य केंद्र यासह फिरती विज्ञान प्रयोगशाळा, अभ्यासिका, संस्कार केंद्र, किशोरी विकास, एक घास प्रेमाचा, स्वावलंबन आयाम आदी उपक्रम समिती मार्फत धुळे जिल्ह्यात राबवण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
जनतेची सेवा केवळ पैसा किंवा वेळ यांच्या माध्यमातूनच करता येत नसून विचारांच्या माध्यमातूनही जनतेची सेवा करता येते. त्यासाठी मात्र समाजाप्रती काही देण्याची भावना असली पाहिजे. सर्वांना सुखी करावे हे ब्रीद साध्य करण्यासाठी संघाने हे उपक्रम सूरू केले आहे. आज घरा घरा पर्यंत लव्ह जिहाद पोहोचला आहे अशा वेळी कुटुंबातून आपल्या मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. आपल्या मुली कुठे जातात कोणाच्या जाळ्यात अडकतात याकडे जागरूकतेने लक्ष देणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या घरात नाही तर स्वतःच्या घरात शिवाजी निर्माण होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक मातेने जिजाऊ बनले पाहिजे असे मत संघटनेच्या राष्ट्र सेवा समितीच्या देवगिरी प्रांतच्या सेवा प्रमुख सौ.वैशाली खेडकर यांनी व्यक्त केले. याचबरोबर डॉ. देवेंद्र पाटील, मेघश्याम बुवा, डॉ. सुधिर साठे, संजय चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात
हम सेवक है मानवता के,
सेवा धर्म हमारा है,
दीन दुखी की सेवा करना,
निश्चित कर्म हमारा है.
हे गीत स्वयंसेवक प्रदीप चतुर्वेदी याने सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह हेमंत कापडी यांनी केले.यावेळी सौ संघमित्रा कापडी, जयवंत शिंपी, संतोष चौधरी, पांडुरंग सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले आणि आभार मयूर पवार यांनी मानले. रुग्णउपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या समीतीमध्ये जयवंत शिंपी, मयूर पवार, प्रा.प्रदीप दिक्षित, परेश नवनितलाल शहा, जितेंद्र मेखे, शरद पाटील, विनोद सोनवणे, दिपक सोनार, दिपक चौधरी, सुभाष माळी, अजय कनोजिया, संजय गिरासे, सागर कासार यांचा सामावेश आहे. गरजूंनी यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.