चक्करबर्डी येथील दोन्ही जलकुंभांना लोकराजा छत्रपती शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले तर प्रवेशव्दाराला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव
नगरसेवक अमोल मासुळेंच्या पाठपुराव्याने फुले-शाहू-आंबेडकर तिनही महापुरुषांचे नामकरण मंजूर
धुळे (प्रतिनिधी) चक्करबर्डी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या जलकुंभासह जुन्या जलकुंभाला आणि येथे उभारण्यात येणार्या प्रवेशद्वाराचे नामकरण करण्याबाबतचे प्रस्ताव दि.२७ रोजी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आले आहे. भाजपा नगरसेवक अमोल मासुळे यांनी दिलेल्या पत्रानुसार आणि त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याने नामकरणाचे विषय मंजुर झाले आहेत.
चक्करबर्डी येथील नवीन जलकुंभाचे लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जलकुंभ असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच जुन्या जलकुंभाला देखिल महात्मा जोतिबा फुले जलकुंभ असे नामकरण करण्यात आले आहे. त्यासोबतच जलकुंभांच्या ठिकाणी उभारण्यात येणार्या प्रवेशद्वाराला डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले आहे. या तिनही नामकरणाचे प्रस्ताव प्रभाग क्र. १७ चे भाजपा नगरसेवक अमोल मासुळे यांनी दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी महापौर तसेच आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन २७ जानेवारीला झालेल्या महापालिकेच्या महासभेत नामकरणाचे प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले आहे.
संपुर्ण मिलपरिसराला तसेच शासकीय दुध डेअरी रोड परिसर, चितोड परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलकुंभ हा चक्करबर्डी येथे आहे. तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वात महत्वाचा जलकुंभ चक्करबर्डी येथे नुकताच बांधण्यात आला आहे. या जलकुंभातूनच अक्कलपाडा धरणाहून येणार्या पाईपलाईनव्दारे संपुर्ण मिलपरिसराला येथून पाणीपुरवठा केला जाणार आहे. या दोन्ही जलकुंभांना अद्याप प्रर्यत नामकरण केले गेले नव्हते, त्यामुळे नगरसेवक अमोल मासुळे यांनी पुढाकार घेत सर्वप्रथम नामकरणासाठी महापालिकेत पत्रव्यवहार केला.
त्यांनी नव्याने उभारलेल्या जलकुंभाला लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जलकुंभ असे नाव देण्याचा प्रस्ताव दिला. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाचे आदर्श आहेत. शाहू महाराज आणि धुळ्याचा जिव्हाळ्याचा संबंध असून भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे हे शाहू महाराजांचे सच्चे वारसदार आहेत. शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा संपुर्ण धुळ्याला कायम मिळत रहावी यासाठीच जलकुंभाला राजश्री शाहू महाराज यांचे नामकरण करण्यात यावे, असा आग्रह नगरसेवक अमोल मासुळे यांनी धरला होता. तसेच चक्करबर्डी येथील जुन्या जलकुंभाला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे नामकरण करण्याचे पत्र सुध्दा नगरसेवक मासुळे यांनी दिले होते.
शहरात ज्योतीबा फुले यांच्या कार्याला वंदन करण्यासह कायम स्मरणात रहावे यासाठी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नामकरणाचा प्रस्ताव दिला. सोबतच चक्करबर्डी येथील जलकुंभाच्या ठिकाणी नव्याने उभारले जणारे प्रवेशव्दार हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दार म्हणून नामकरण करण्यात यावे असेही पत्र नगरसेवक अमोल मासुळे यांनी दिले होते. एकाच ठिकाणी फुले-शाहू-आंबेडकर असे तिन महामानवांचे स्मरण करणारे अनोखे स्थळ धुळ्यात यानिमित्ताने साकार झाले आहे.
महासभेत तिनही महापुरुषांच्या नामकरणाचे प्रस्ताव एकमताने मंजूर केल्याबद्दल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुपजी अग्रवाल, महापौर प्रदीपनाना कर्पे, आयुक्त देविदासजी टेकाळे यांच्यासह सभागृहात उपस्थितीत सर्व सन्मानिय नगरसेवक, नगरसेविका आणि मनपा प्रशासनाचे नगरसेवक अमोल मासुळे यांनी जाहिर आभार व्यक्त केले आहे. तसेच नामकरणामुळे तिनही महापुरूषांच्या स्मृतिंना उजाळा मिळून योग्य तो सन्मान दिल्याबद्दल नगरसेवक अमोल मासुळे यांचे परिसरातील नागरिकांसह समाजघटकांतून आभार व्यक्त केले जात आहे.