मंत्री आदित्य ठाकरे यांचे सिल्लोड मतदारसंघात जंगी स्वागत
ठिकठिकाणी करण्यात आली पुष्पांची उधळण
सिल्लोड (विवेक महाजन) राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री तसेच युवासेनाप्रमुख ना.आदित्यजी ठाकरे यांचे सिल्लोड मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले. बाभूळगाव या मतदारसंघाच्या पहिल्या गावापासून सिल्लोड शहर ते अजिंठा लेणी पर्यंत औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील प्रत्येक गावाच्या ठिकाणी शिवसेना- युवासेना व महिला आघाडीच्या वतीने मंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पांची उधळण करण्यात आली. अजिंठा लेणी पॉईंट येथे बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गाणी – म्हणी गात मंत्री आदित्य ठाकरे यांचे आगळेवेगळे स्वागत केले. सिल्लोड – सोयगावच्या वतीने करण्यात आलेले अनोखे स्वागत सत्कार पाहून मंत्री आदित्य ठाकरे तसेच आलेले इतर मान्यवर भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते सिल्लोड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यानंतर ना. आदित्य ठाकरे यांचा ताफा सिल्लोड शहरातून मार्गस्थ झाला. यावेळी शहरातील प्रत्येक चौकात ना. आदित्य ठाकरे यांच्यावर पुष्पांची उधळण करण्यात आली. शहरातील नागरिकांचा उत्साह पाहून ना. आदित्य ठाकरे यांनीही प्रत्येक चौकात गाडी रोखत स्वागताचा स्वीकार केला. दरम्यान यावेळी ना. आदित्य ठाकरे यांनी शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे भेट दिली. यावेळी शिवसेना युवासेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी ना. आदित्य ठाकरे यांना तलवार भेट देत त्यांचे स्वागत केले.
प्रारंभी ना. आदित्य ठाकरे यांनी अजिंठा व्ह्यू पॉईंट येथून लेणीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अजिंठा लेणी येथील अभ्यागत केंद्रातील पाहणी करून येथील उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ना. आदित्य ठाकरे यांनी अजिंठा लेणीची पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ना. आदित्य ठाकरे यांना फर्दापूर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक तसेच भीमपार्क प्रकल्पाची माहिती दिली. सोबतच मतदारसंघात तापी आणि गोदावरी दोन खोरे येत असल्याने येथील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी सिंचन प्रकल्प उभारणे गरजेचे असून त्यादिशेने काम सुरू असल्याचे सांगितले. स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या तसेच येथे पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, सिल्लोडच्या नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, तहसीलदार विक्रम राजपूत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, डॉ. संजय जामकर, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल , शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, प्रभाकर आबा काळे ( सोयगाव ) सिल्लोड शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, शेख इम्रान ( गुड्डू ) , धैर्यशील तायडे, शिवा टोम्पे, प्रवीण मिरकर आदींसह शिवसेना नगरसेवक, सरपंच तसेच शिवसेना – युवासेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.