मुलींना शाळेत हिजाब वापरू देण्यास नकार भयावह ; मलाला युसुफझाईने व्यक्त केली भीती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत जाऊ देण्यास नकार देणे हे भयावह आहे, असे मत नोबेल पुरस्कार विजेती महिला हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिने व्यक्त केले आहे. मुलींच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलल्याबद्दल २०१२ मध्ये पाकिस्तानातील तालिबानकडून मलालाला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. दरम्यान, मलालाने भारतीय नेत्यांना मुस्लिम महिलांचे दुर्लक्ष थांबविण्याचे आवाहन केले.
“कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे,” असे मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हिजाबच्या वादामुळे कर्नाटकात सुरू झालेले आंदोलन मंगळवारी राज्यभर पसरले. कॉलेज कॅम्पसमध्ये दगडफेकीच्या घटनांमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सरकार आणि उच्च न्यायालयाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थिनींना हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी त्यांच्या एका याचिकेवर न्यायालय विचार करत आहे. या प्रकरणाचे मोठ्या वादात रुपांतर झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मंगळवारी उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. मात्र, सोशल मीडियावर या मुलींच्या बाजूने समर्थनाचा वर्षाव झाला. हिजाब घालण्याच्या अधिकाराच्या मागणीसाठी आपला विरोध सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीने सांगितले की तिला शिक्षकांचा पाठिंबा आहे आणि ज्या मुलांनी तिला भगव्या शालीत रोखले ते बाहेरचे होते.