नोकरीच्या पहिल्याच दिवशी आला कंटाळा ; सुरक्षा रक्षकाने ७.४७ कोटींच्या चित्रावर बॉलपेनने काढले डोळे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कंटाळा येणं ही बाब काही नवीन नाही. कंटाळा प्रत्येकाला येतो. कोरोना काळात लोकांना घरी बसूनही कंटाळा आलाच. मात्र हा कंटाळा भलंमोठं नुकसानही करू शकतो ही बाब आता समोर आली आहे. एका सुरक्षा रक्षकाने नोकरीच्या पहिल्या दिवशी कंटाळा घालवायचा म्हणून एका चित्रावर बॉलपेनने डोळे काढले. आता याबाबतची बातमी व्हायरल झाली आहे. कारण हे चित्र साधसुधं नाही तर त्याची किंमत ७.४७ कोटी रूपयांहून जास्त आहे.
पश्चिम-मध्य रशियामधील स्वेर्डलोव्हस्क ओब्लास्ट प्रांतामधील येल्टसीन सेंटरमध्ये हा सारा प्रकार घडलाय. या सुरक्षारक्षकाने खराब केलेल्या कलाकृतीचं नाव ‘थ्री फिंगर्स’ असं आहे. ही कलाकृती १९३२ ते १९३४ या कालावधीमधील आहे. अॅना लेपोरस्काया यांच्या शोमधील ट्रेटयाकोव्ह गॅलरीमधील हे चित्र आहे. या चित्रामधील तीन व्यक्तींच्या चेहऱ्यांपैकी दोन चेहऱ्यांवर सुरक्षारक्षकाने बॉल पेनने डोळे काढल्याचा दावा करण्यात आल्याचं मेट्रो या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात करण्यात आलाय.
खासगी सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या या सुरक्षारक्षकाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नसला तरी त्याचं वय ६० वर्ष असल्याची माहिती समोर आलीय. या व्यक्तीला कामावरुन काढून टाकण्यात आलंय. डिसेंबर महिन्यामध्ये सात तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ‘द वर्ल्ड अॅज नॉन-ऑब्जेक्टिव्हिटी, द बर्थ ऑफ अ न्यू आर्ट’ या प्रदर्शनात हे चित्र ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी हा सारा धक्कादायक प्रकार घडलाय.
या चित्राची नेमकी किंमत ठाऊक नसली तर अल्फा नावाच्या विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या चित्राचा विमा ७ कोटी ४७ लाखांचा आहे. आता ही कंपनीच या चित्राची डागडुजी करण्याचा खर्च करणार आहे. या चित्राला पूर्वप्रमाणे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट काम करत आहे.