चोपडा (विश्वास वाडे) शेतकऱ्यांची संस्था सचोटी व प्रामाणिकपणे चालली आहे.शेतकरी हिताची कामे होत असल्याने सहकारी संस्था प्रगती साधत आहेत. तापी सूतगिरणीचे चेअरमन माजी आ.कैलास पाटील यांचे नेतृत्वाखाली हा प्रकल्प चांगली प्रगती साधत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांनी येथे केले.
तापी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग प्रेसिंगचे भुमिपूजन प्रसंगी ना.वळसे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी होते. मंत्री महोदयांचे हस्ते विधिवत पूजन करुन व कुदळ मारून भुमिपूजन करण्यात आले. यावेळी अतिथींचा सत्कार सूतगिरणी चेअरमन माजी आ.कैलास पाटील, व्हा.चेअरमन प्रभाकर पाटील व संचालकांनी केला. प्रास्ताविकांत चेअरमन पाटील म्हणाले की,सूतगिरणी तालुक्यात सुरु झाल्यानंतर तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देता आला आहे. सुमारे शंभर कोटींचा हा प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा देणारा ठरावा म्हणून जिनिंग प्रेसिंग सुरु केली जाणार आहे. अंदाजे चार कोटी रुपयात याची उभारणी होणार असली तरी पंधरा कोटी रुपये त्यासाठी उभारावे लागणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल.
यावेळी मंचावर माजी मंत्री एकनाथराव खडसे,जिल्हा बॅंकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील (अमळनेर), जिल्हा कॅाग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड.संदीप पाटील, जिल्हा बॅंक संचालक घनःश्याम अग्रवाल, माजी आ.प्रा.दिलिपराव सोनवणे, मनिष जैन, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड.घनःश्याम पाटील, निता पाटील, पं.स.सभापती कल्पना पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हा.चेअरमन शशीकांत देवरे, शेतकी संघ प्रेसिडेंट दुर्गादास पाटील, न.पा.गटनेते जीवन चौधरी, उद्योजक आशिष गुजराथी, विजयाताई पाटील, कृउबा सभापती दिनकर देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सूतगिरणीचे संचालक उपस्थित होते. सुत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संजय बोरसे यांनी केले.