गणित विषयाकडे विद्यार्थ्यांनी गंमत-जंमत म्हणून पाहायला पाहिजे : नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख
रोटरी क्लब दोंडाईचातर्फे मॉक टेस्ट मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दोंडाईचा (प्रतिनिधी) शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी गणित विषय हा कठीण न मानता. गणित विषयाकडे गंमत-जंमत म्हणून पाहायले पाहिजे. तरच गणित विषय सोपा होत असुन भविष्यात आयुष्याचे गणितही सोपे-सोडवण्यास मदत होते,असे मत नगराध्यक्ष व ज्ञानोपासक संस्थेचे चेअरमन डॉ. रविंद्र देशमुख यांनी रोटरी क्लबतर्फ आयोजित माँर्क टेस्टमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी मांडले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ दोंडाईचातर्फे रोटरी क्लबचे डीजीई श्रीकांत इंदानी, इंजि. हिमांशू शाह , इंजि. अनिश शाह, इंजि. गुलाम शेख, डॉ. चेतन बच्छाव, डॉ. दिलीप पाटील, डॉ. बी. एल. जैन यांच्या मार्गदर्शनाखाली भांडारकर क्लासेस दोंडाईचा येथे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात आली होती. सदर मॉक टेस्ट मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक ६ मार्च २०२२ रोजी भांडारकर क्लासेस दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष दोंडाईचा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे चेअरमन डॉ. बापूसाहेब रविंद्र देशमुख हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भांडारकर क्लासेसचे संचालक प्रा. प्रकाश भांडारकर हे लाभले होते. तसेच सदर कार्यक्रमास दोंडाईचा रोटरी क्लबचे चेअरमन राकेश जयस्वाल, रोटेरियन प्रा. डॉ. प्रवीण पाटील, प्रोजेक्ट चेअरमन सतीश पाटील यांनी उपस्थिती नोंदवली.
ह्या मॉक टेस्ट मध्ये इयत्ता १० वीतील ६० विद्यार्थी आणि इयत्ता १२ वीतील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून सतीश पाटील सर यांनी परीक्षेचे मूल्यमापन करून दहावी आणि बारावीचे एक ते तीन क्रमांक निवडले. त्यात इयत्ता दहावी मधील प्रथम क्रमांक कुमारी भावना हिरालाल ठाकरे, द्वितीय क्रमांक मयुरी योगेश कुलकर्णी, आणि तृतीय क्रमांक विशाखा किशोर पाटील या विद्यार्थ्यांनी पटकावला. तसेच इयत्ता बारावी मध्ये प्रथम क्रमांक हर्षल प्रकाश बेहरे, द्वितीय क्रमांक दर्शन संजय न्याहळदे, आणि तृतीय क्रमांक रोशनी दिनेश चौधरी या विद्यार्थ्यांनी पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा रोटरी क्लब तर्फे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भांडारकर क्लासेसचे संचालक प्रा. प्रकाश भांडारकर यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा जीवनात यशस्वी होण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे याचे विविध उदाहरणांच्या आणि दाखलांच्या साह्याने विवेचन केले. दोंडाईचा रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश जयस्वाल यांनी रोटरी क्लब विविध प्रोजेक्ट कशा पद्धतीने राबविते आणि आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात रोटरीचे योगदान कशा पद्धतीने आहे. याची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब रवींद्र देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात गणित विषयाला कठीण न मानता.गणित विषयाकडे गंमत-जंमत म्हणून पाहायला पाहिले. जर हे गणित सोपे झाले तर पुढे-भविष्यात आयुष्याचे गणितही सहज सोपे-सोडवता येते.तसेच यापुढेही विद्यार्थ्यांनी गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणे किती महत्त्वाचे असते याविषयीही सखोल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तसेच कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे डॉ. बापूसाहेब रवींद्र देशमुख यांनी गणिताच्या विविध संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. गणिताची ही मॅजिक पद्धत विद्यार्थ्यांना विशेष आकर्षण ठरली आणि डॉ.बापूसाहेब रवींद्र देशमुख यांच्यात लपलेला गणिताचा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रकर्षाने जाणवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन सतीश पाटील यांनी केले.