तरुणांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे ; कपिल पाटलांचे मुरबाडमधील तरुणांना आवाहन
शहापूर (भावेश ठाकरे) आझादी का अमृत महोत्सव विशेष किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियानांतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर संलग्न कृषि विज्ञान केंद्र, नागांव, ता. मुरबाड, जि. ठाणे यांच्या वतीने डॉ. सुरेश द. जगदाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या मार्फत कृषि विज्ञान केंद्राच्या आवारामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना कपिल पाटील (केंद्रीय राज्यमंत्री पंचायतीराज) यांनी तरुणांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे आणि कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीसाठी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले.
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळावे जेणेकरून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल, जमिनीचे व मानवाचे आरोग्य चांगले राहील, अन्नामध्ये पोषक तत्त्वे वाढतील यावर मार्गदर्शन केले. तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे व मुंबई बाजारपेठ जवळ असल्यामुळे त्याचा लाभ घेऊन ठाणे जिल्ह्यातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे असे कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रमासाठी ना. किसन कथोरे (आमदार, मुरबाड विधानसभा), दिगंबर विशे (माजी आमदार, मुरबाड विधानसभा), सुभाष घरत (जि. प. सदस्य, ठाणे), उल्हास बांगर (जि. प. सदस्य, ठाणे), स्वराताई चौधरी (सभापती, पंचायत समिती, मुरबाड), बुधाजी बंगार (संचालक, समता शेतकरी उत्पादक कंपनी) व गोकुळ जाधव (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, मुरबाड) उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कर्नल डॉ. आशिश पातुरकर, कुलगरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर, डॉ. अनिल बिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शेतकरी मेळाव्यास ३०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.