विजेच्या लपंडावाने बोरद परिसरातील नागरिक हैराण
बोरद : गेल्या अनेक दिवसापासून भारनियमन हा शब्द अनेकांच्या तोंडी आणि पचनी पडताना दिसत आहे परंतु याचे दूरगामी परिणाम आता सर्वांना भोगावे लागणार आहे असे दिसून येत आहे.
हीच बाब बघता गेल्या अनेक दिवसापासून बोरद परिसरामध्ये विजेचा लपंडाव होत असल्याचे बोरद वासियांकडून सांगण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारची भारनियमनाबाबत सूचना न देता बोरद येथील विद्युत कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून दहा मिनिटे विद्युत पुरवठा सुरळीत तर १० मिनिटे खंडित असा खेळ सध्या बोरद परिसरामध्ये नागरिकांना अनुभवयास येत आहे. हे कमी होतं की काय गेल्या दोन दिवसापासून दुपारी १ नंतर विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो आणि तो संध्याकाळी ६ वाजेनंतर पूर्ववत करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेल्या बोरद परिसरातील जनतेला भारनियमनामुळे अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे.
माणसांच्या चुकीमुळे परिसरात झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे एक तर आधीच उष्णता एका लाटेच्या स्वरूपामध्ये परिसरामध्ये आपलं बस्तान बसवून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. दुपारी १२ वाजेनंतर बोरद गावातील मुख्य बाजारपेठ भागात शुकशुकाट पहावयास मिळतो आहे. जो तो उन्हापासून बचावासाठी घरामध्ये राहणेच पसंत करत आहेत. परंतु बाहेर उष्णतेचे अधिक प्रमाण असताना घरात वीज नसल्यामुळे उकाड्याने जीव कासावीस होतांना दिसून येत आहे. त्यामुळे दुपारी बाहेर गेलो तर उन्हामुळे शरील भाजल्यागत होत आहे तर घरात उकाड्याने जीव कासावीस होत आहे. उष्णता जास्त असल्यामुळे जे दम्याच्या आजाराने ग्रस्त लोक आहेत ते विद्युतपुरवठा नसल्यामुळे आपल्या घरातील फॅन अथवा एसी किंवा इतर हवेसाठी उपलब्ध होणाऱ्या साधनांचा वापर करू शकत नाहीत. कारण बहुतांश साधने विजेवर चालत असतात. त्यामुळे काही लोकांना फॅन व इतर साधनांची सवय झाल्यामुळे विद्युत पुरवठा जराही खंडित झाला तरी त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.
ऐन उन्हाळ्यामध्ये भारनियमनाला सामोरे जावे लागेल असे लोकांना कधीच वाटले नव्हते. पण भर उन्हाळ्यातच कोळशाची टंचाई भासवून शासनामार्फत भारनियमनाचा अनोखा खेळ मांडण्यात आलेला आहे. या खेळामध्ये जनता होरपळून निघत असल्याचे चित्र सध्या तरी ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.
शेत शिवारामध्ये उन्हामुळे सध्यातरी पीक अल्प प्रमाणात आहेत जी बागायती जमीन आहे त्या ठिकाणी केळी, ऊस त्याचबरोबर टरबूज वगैरे इत्यादी पिके पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेत शिवारामध्ये विजेचा लपंडाव सहन केला जात आहे. परंतु नुकताच मे महिना येऊ घातल्याने या ठिकाणी बागातदार शेतकरी कापसाची लागवड करत असतो. त्यामुळे कापसाची लागवड बागायत पद्धतीमध्ये होत असल्याने त्याला पाण्याची नितांत गरज आहे अशा परिस्थितीमध्ये जर भारनियमन शेतातील ग्राहकांनाही लागू झाल्यास याचे दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत. तरी भारनियमन करताना सूचना देऊनच भारनियमन केले जावे. असे ग्रामीण भागातील जनतेकडून आपले मत व्यक्त केले जात आहे.