जळगाव मधील कुशासनपर्व !
जळगाव : जळगाव शहरातील रस्ते मागील दहा वर्षांपासून बनवले नाहीत. लोक खड्यात पडतात.हातपाय मोडतात.काही मरतात.पेपरला बातमी येते.लोक वाचतात.एक मिनीट दुख व्यक्त करतात.दुसऱ्या दिवशी दुसरी बातमी येते. नवीन अपघात, नवीन दुख.मागचे दुखावर पांघरूण पडते.हे पांघरूण कापडाचे नाही.हे पांघरूण मातीचे नाही.हे आहे निराशेचे.हतबलतेचे.
आमदार सुरेश भोळे मागील साडेसात वर्षांपासून आमदार आहेत.पाच वर्षे तर ” हात घी मे और सर कडई मे” होते.नवरा आमदार आणि बायको महापौर?तरीही काहीच करू शकले नाहीत.जळगांव शहराचे शांघाय बनवू असे आश्वासन देऊन संकटमोचन मंत्री गिरीश महाजन यांनी गुंड, गुन्हेगारांना निवडून आणले.आमदाराची बायको महापौर बनली.भाजपचा वजनदार मुख्यमंत्री.भाजपचा वाकबगार पालकमंत्री.भाजपचा मल्हईदार आमदार.भाजपची वारसदार महापौर.तरीही जळगाव जसे होते तसेच राहिले.उलट वाटर ग्रेस ने घाण केली.मक्तेदार सुद्धा मर्जीतील पार्टनर घेऊनही शहर स्वच्छ झाले नाही.नेत्यांच्या डोक्यातील कचरा गल्लोगल्ली सांडला.आणि गल्लीतील माती भरून वजनकाटा वर ठेवली.लोकांच्या घाणीतून सुध्दा धंदा करणाऱ्या नगसेवकांमधे सिव्हील वार झाले.गिरीश महाजनांनी इकडून तिकडून चोरलेले गद्दार नगरसेवक गद्दारी करून शिवसेनेत पडून गेले.”आधे इधर ,आधे उधर ,बाकी मेरे पिछे” अशी महाजनांची हालत करून टाकली.नालायक लोकांना राजकीय गणवेश घातल्याचा हा परिणाम.काहींनी तर महाजन आंघोळीला बसले असतांना त्यांचे कपडे चोरून नागडे करण्याचा प्रयत्न केला.म्हशीवर बसून बाहेर येण्याची अवघड परिस्थिती ओढवली. गुंड गुन्हेगार सोबत घेऊन तुम्ही सुशासन करू शकत नाहीत.या काळाला जळगाव मधील कुशासनपर्व म्हणतात.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच दुर्योधन बनून दु:शासन करीत आहेत.बेलगाम बनले आहेत.राजनितीचा अभाव आहे.गुन्हेगारीचा प्रभाव आहे.जिल्हा परिषद बरबाद झाली.महानगरपालिका कुरूक्षेत्र बनली. भाजपचे नगरसेवक शिवसेनेत न आणता महानगरपालिका काम करू शकत नसेल तर हे पालकमंत्री चे अपयश आहे.येथे प्रशासन फेल झाले.राजकारण हावी झाले. बैल बाजार बनला. नगरसेवक खरेदी विक्री करण्याचा.हा घोडेबाजार नाही,बैल बाजार आहे.जेथे नगरसेवक आणि जनावरे यातील फरक संपला.हे कुशासनपर्व आहे.
कोरोनाकाळात औषधी आणि यंत्रसामुग्री खरेदीसाठी सरकारने निधी दिला.पालकमंत्रीने चोरांचे टोळके बनवून हात मारला.असा आरोप पोलिसात झाला.कोर्टात झाला.पालकमंत्री सामोरा आले नाहीत. कोरोना परवडला पण गुलाबराव नको.असे म्हणण्याची वेळ आली आहे. मंत्रीमंडळ आणि तमाशामंडळ यात फरक उरलेला नाही.चिखलफेक म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे चिखलफेक.अडीच वर्षात असे एक काम सांगा,जे चांगले केले.ना जिल्ह्यात,ना राज्यात.हे कुशासनपर्व आहे.
धरणगाव, अमळनेर, नरडाणा सारख्या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रीज बनले.वापरले.जुने झाले.आता नवीन बनवण्याच्या तयारीत आहेत.पण जळगाव शहरातील एक ब्रीज साडेतीन वर्षांपासून लोंबकळतो आहे.पुलाचे पाय शिवाजीनगरच्या पाळण्यात दिसू लागले.शिवाजीनगर म्हणजे भ्रष्टाचाराचे तिर्थक्षेत्र.एकेकाळी येथे भ्रष्टाचाराचे अभिमत विद्यापीठ चालत होते. येथील प्रत्येक माणूस स्नातक, विद्यावाचस्पती. अहोरात्र , सकाळ, संध्याकाळ ,घरात बाहेर तोच अभ्यास चालू असतो .एकाला सिंमेटमधे वाटा पाहिजे.दुसऱ्याला सळईमधे.तिसऱ्याला रेतीमधे. म्हणून पुलाचे पाय इकडे तिकडे ताणू लागले.पुलाच्या बाळंतपणात मोठे सिझर झाले.तरीही बाळ मनासारखे जन्माला आलेच नाही.त्याला पाय कसा असावा,या मागणीला पाय फुटले.एकाला टी पाहिजे.एकाला एल पाहिजे.एकाला तर वाय झाला.मक्तेदार आणि त्याचा मशीहा याची सत्ता जाताच पुलाचे क्लोन,व्हेरीयंट डोक्यात शिरले.कोरोना आला,गेला पण पुलाचा क्लोन अजून डोकी गरम करीत आहे.
जळगाव शहरातील अमृत योजना आता विषारी योजना वाटू लागली.जळगांव शहर मोहेंजोदारो सारखे खोदूनही कोणतीही संस्कृती सापडत नाही.येथे सापडली फक्त भ्रष्टाचाराची संस्कृती.इतर शहरातील अमृत योजना बनवून जुनी झाली.पण जळगाव मधे अजून खड्ड्यातच आहे.कारण एखाद्या मक्तेदाराने काम सुरू केले कि,पन्नास टक्के कमीशन नगरसेवक, आमदार, पालकमंत्री यांना पाहिजे.म्हणून महाराष्ट्रात सेनेचा मुख्यमंत्री बनताच भाजपचे नगरसेवक सेनेकडे पळाले.पळून जातांना भाजपने कमरेवर पाय ठेवला.म्हणून डोके सेनेकडे आणि पाय भाजप कडे अडकले आहेत.आणि आश्चर्य महापौर सेनेचा आणि विरोधी पक्ष नेताही सेनेचाच.दोघेही पती-पत्नी.इतिहासाची संपुर्ण पाने चाळून पाहिली.असा सत्ता प्रकार कुठेही आढळत नाही.तो आढळतो जळगाव ला.
गुंड, गुन्हेगारांना राजकीय गणवेश चढवला तर काय प्रकार घडतो,तो महाभारतात वाचायला मिळतो.जळगावला आंखो देखा पहायला मिळतो.अजिंठा रेस्ट हाऊसमधे तर चक्क आमदारांनी, पालकमंत्र्यांनी आपापले कोठ्या बळकावून घेतल्या.आता लखनौला जाण्याची गरज नाही.उमराव जान येथेच थयथयाट करील.असा प्रकार महाभारत काळात घडलेला आढळत नाही.जळगावला घडला.हे आहे कुशासनपर्व!
भारतात १९४२ते १९४५ आणि नंतर १९७५ते१९७७ कालखंडात राजधर्माला ग्लानी आली होती.तेंव्हा सुद्धा प्रजाजनांचे सृजन झाले होते.सज्जनांचे संघटन झाले होते.आता जळगाव शहरातील, जिल्ह्यातील राजधर्माला ग्लानी आली आहे.मुर्छा आली आहे.अवकळा आली आहे.सभ्य,सज्जन जनतेचे संकलन,सम्मेलन,संघटन, आंदोलन झाले पाहिजे.सज्जनांनी सज्ज झाले पाहिजे.तरच जळगाव चे अभिउत्थान शक्य आहे.कुशासनपर्व संपवणे शक्य आहे.
कुशासन हटवतांना रक्षक मदत करणार नाहीत.पत्रक मदत करणार नाहीत.ते त्या प्रशासनात मिसळलेले आहेत.विरघळलेले आहेत.येथे कर्ण कौरवांचा सखा आहे,संजय धृतराष्ट्राचा दास आहे.विदूर काका बधीर झाला आहे.द्रोणाचार्य, कृपाचार्य,भिष्माचार्य अधीन झाले आहेत.म्हणून नागरिक जन हो,तुम्हालाच हा लढा द्यायचा आहे.हिंमत असेल तर या सोबत.डॉक्टर, इंजिनिअर,वकील, प्रोफेसर, व्यापारी ही आपली कसोटी आहे.आतापर्यंत स्वताच्या कल्याणासाठी बुद्धी,ज्ञान,वेळ वापरला.आता जळगाव शहरासाठी बुद्धी,ज्ञान ,वेळ देण्याची परिस्थिती ओढवली आहे.हे शहर तुमचे आपले वाटत असेल तर!
यदा यदा ही राजधर्मस्य ग्लानीर्भवेत,भारत:
अभिउत्थानाय राजधर्मस्य सृजयते वयम प्रजा!
… शिवराम पाटील..
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
(टिप: वरील लेखात लिहलेल्या मताशी संपादक मंडळ सहमत असेल असे नाही,वरील लेखात लिहलेले मत हे व्यक्तिगत लेखकाची आहेत,कुणाला काही आक्षेप असल्यास आपण लेखकाशी सम्पर्क करावा.)