अन्यथा शहरात फिरणे महागात पाडू ; शिवसेनेचा आयुक्तांना पत्राद्वारे इशारा
धुळे (करण ठाकरे) शिवजयंतीनिमित्त शहरात अनेक ठिकाणी शिवप्रेमींनी बॅनर लावलेले बॅनर अनधिकृत असल्याचे कारण सांगत, महापालिकेकडून हे बॅनर काढण्यात येत आहे. मात्र इतर बॅनर काढण्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले आहे. शहरभर लागलेले बॅनर काढण्याचे आदेश मागे घ्या अन्यथा तुमचे शहरात फिरणे मुश्कील करू असा सज्जड इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी आयुक्त देवीदास टेकाळे यांना पाठविलेल्या खुल्या पत्राद्वारे दिला आहे.
पत्रात म्हटले आहे की, शिवजयंतीनिमित्त शहरात लावलेले बॅनर लावण्यासाठी परवानगी नसल्याने बेकायदेशीर ठरवून सोमवारपासून बॅनर काढण्याचा सपाटा महापालिकेने सुरू केला आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर लागलेले असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर शिवजयंतीनिमित लावण्यात आलेले बॅनर बेकायदेशीर ठरविले जात आहे. महापालिकेने तत्काळ बॅनर काढण्याचा आदेश मागे घ्या, अन्यथा शिवप्रेमी युवकांना घेऊन महापालिकेवर मोर्चा काढावा लागेल.
शहरात विना परवानगी एकही बॅनर लावू देऊ नये, त्यासाठी आदेश काढावे. कठोर अंमलबजावणी करावी, आम्ही तुमच्या समर्थनात राहू, परंतु शिवजयंती सोडून ही कारवाई करावी. गावगुंडांचे बॅनर काढण्याची हिंमत दाखवा चोरी व खुनासह अनेक अवैध व्यवसाय करणारे गुंड बेकायदेशीर बॅनर लावतात. अशा गुंडांमुळे पुढाऱ्यांची देखील दुकानदारी चालते. असे बॅनर काढण्यासाठी मनपाने हिंमत दाखवावी, असे आवाहन मनोज मोरे यांनी दिले.



