‘…तर तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील’ ; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
मुंबई (प्रतिनिधी) आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्न कृती समितीने सरकारच्या नजरेत आणून दिलेत. त्याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे प्रयत्न असतील, असं राज्य सरकारने सांगितलं. त्यानंतर एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर यायला पाहिजे, असं पवार म्हणाले. तुमच्या इतर प्रश्नांवरही सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेन, अशी ग्वाही यावेळी पवारांनी दिली.
“कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याबाबत उल्लेख आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलंय, ही आनंदाची बाब असल्याचं पवार म्हणाले. आम्ही कामगारांच्या समस्या मनावर घेणार नाही, असा समज काही लोकांनी पसरवला होता, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हा संप सोडवायला दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच आम्ही हा संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील.” असं आवाहन शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय. तर एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असं पवार म्हणाले.