विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्काची भावनिक पोस्ट ; म्हणाली..
मुंबई (वृत्तसंस्था) स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. विराटच्या राजीनाम्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं त्याच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.
अनुष्का म्हणते….
“२०१४ मधला मला तो दिवस लक्षात आहे, जेव्हा तू कर्णधार म्हणून तुझी निवड झाल्याचं मला सांगितलं होतस. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मला लक्षात आहे, एमएस, तू आणि मी नंतर चॅटिंग करत होतो. त्यावेळी तो मस्करी मध्ये म्हणाला होता, विराटची दाढी आता लवकरच सफेद होईल. आपण सगळेच त्यावर हसलो होतो. त्यादिवसापासून तुझी दाढी सफेद होण्याशिवाय मी बरच काही बघितलं आहे” असं अनुष्काने लिहिलं आहे.
“मी तुला प्रगती करताना पाहिलं. “भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तू जी प्रगती केलीस आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने जे यश मिळवलं, त्याचा मला अभिमान आहेच. पण तू तुझ्या स्वत:मध्ये जी प्रगती केलीस, त्याचा मला जास्त अभिमान आहे” असे अनुष्का शर्माने म्हटलं आहे.
“२०१४ मध्ये आपण खूप तरुण आणि भोळेभाबडे होतो. चांगला हेतू, सकारात्मक ऊर्जा आणि प्रोत्साहनामुळे आयुष्यात आपण पुढे जातो, असा आपण विचार करायचो. हे बरोबर आहे पण पुढे जाण्यासाठी आव्हान सुद्धा महत्त्वाची असतात. बहुतांश आव्हानांचा तुला फक्त मैदानावरच सामना करावा लागला नाही. पण हे आयुष्य आहे? जिथे फार कमी अपेक्षा असतात. तिथे तुमची परीक्षा घेतली जाते” असं अनुष्काने लिहिलं आहे.
“तुझे जे चांगले हेतु होते, त्या मध्ये तू काही येऊ दिलं नाहीस, याचा मला अभिमान आहे. तू उदहारण देऊन नेतृत्व केलस. मैदानावर विजयासाठी पूर्ण ऊर्जा झोकून दिलीस. काही पराभवानंतर मी तुझ्या शेजारी बसली होती. त्यावेळी तुझ्या डोळ्यात अश्रू होते. यापेक्षा विजयासाठी अजून जास्त काय करु शकतो हाच विचार तुझ्यामध्ये असायचा. असा विचार करणारा विराट आहे. प्रत्येकाकडून अशीच अपेक्षा करतोस” असे अनुष्का शर्माने म्हटलं आहे.