मुंबईतील ७१ पोलिसांना कोरोना ; ५५ वर्षांवरील पोलिसांना घरातून काम करण्याची मुभा
मुंबई (प्रतिनिधी) मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिसांनाही मोठया प्रमाणात संसर्ग झाला आहे. यामुळे ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिली.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत अनेक पोलिसांना जीव गमवावा लागला होता. तिस-या लाटेचा मुंबईत मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांमध्ये याचा संसर्ग झाला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली असून पोलिस दलातील सक्रिय रुग्णसंख्या आता २६५ वर पोहचली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना २४ तास ड्युटी करावी लागत आहे. गृहविभागाने पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचा-यांना देखील वर्क फ्रॉम होम ही पध्दत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.पोलिस दलातील ५५ वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम ची मुभा देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.