समाजाचं देणं लागतो ही भावना निर्माण होणे गरजेचे : विश्वास कुलकर्णी
नंदुरबार (प्रतिनिधी) समाजात वावरताना आपण समाजाचे देणं लागतो अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. पतसंस्था म्हणजे एक कुटुंब असुन यात समन्वय आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणातून सज्ज करावे असे प्रतिपादन सहकार भारतीचे जळगाव कार्यालय प्रमुख विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सहकार भारतीतर्फे पतसंस्था चेअरमन, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांशी हितगूज साधण्यासाठी सुसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील देसाईपुरा भागात दीनदयाल नागरी पतपेढीच्या सभागृहात सुसंवाद कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी दीनदयाल पतपेढीचे चेअरमन नानाभाऊ माळी होते. याप्रसंगी पुढे बोलतांना विश्वास कुलकर्णी म्हणाले की, जळगाव जनता बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांच्या सोबत सहकार भारतीच्या निमित्त भारतभर भ्रमंती केली. बचत गटाच्या माध्यमातून कान्हदेशाचे वांगे, भरीत पुण्या-मुंबईसह परदेशात गेले. मोकळ्या मनाने राहून आईसारखे निस्वार्थी जीवन व्यतीत करावे. यात पतसंस्थेचे चेअरमन व्यवस्थापक आणि संचालक मंडळांनी सदैव सतर्क राहणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रातील राज्य व देशातील महत्त्वपूर्ण संस्थांना भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करून सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. जन्मदात्री आई परत फेडीची अपेक्षा करत नाही. असे सांगून विश्वास कुलकर्णी यांनी सहकार क्षेत्रातील माहितीचा ऊहापोह केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांनी केले. तसेच गेल्या डिसेंबर महिन्यात लखनऊ येथे झालेल्या सहकार भारतीच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झालेले बँक प्रकोष्ठ प्रमुख बाळकृष्ण वाणी व संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी अधिवेशनाच्या सुरेख, शिस्तबद्ध आयोजनाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन वामन चौधरी यांनी केले. सुसंवाद कार्यक्रमास सहकार भारतीचे सदस्य पांडुरंग माळी, प्रल्हाद भावसार, रोहिदास सौपुरे, सुभाष परदेशी, प्रसाद अर्थेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलेश कासार, पुष्पेन्द्र कुंभार यांनी परिश्रम घेतले.


