बोरद येथील भोंगऱ्या बाजारात अफाट जनसमुदाय ; झाली लाखोंची उलाढाल
तळोदा (दिपक गोसावी) तळोदा तालुक्यातील बोरद येथे होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भोंगर्या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या भोंगर्या बाजारात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हजारो बांधव जे कामानिमित्त गुजरातमध्ये गेलेले असतात ते ही परत आल्याचे दिसून आले. तसेच शहादा, तळोदा, धडगाव व नंदुरबार तालुक्यातील बहुतांशी बांधव ही उपस्थित होते. यामुळे बोरद येथे मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. असंख्य जनसमुदाय या ठिकाणी आल्यामुळे या भोंगर्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.
दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे भोंगर्या बाजार भरला नव्हता. मात्र यावर्षी सर्व मुक्त असल्यामुळे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत भोंगर्या बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन वर्षात प्रथमच भोंगर्या बाजार भरत असल्यामुळे गेल्या २ वर्षापेक्षा यावर्षी व्यावसायिकांची दुकाने मोठ्या प्रमाणात आली होती. या वर्षी बचत गटांनीही आपली दुकाने थाटली होती.न भूतो न भविष्य असा जनसमुदाय बाजारात लोटला होता. गुळ, हार कंगन, खजूर, डाळ्या इत्यादींची मोठ्या प्रमाणात दुकाने याठिकाणी सजली होती.
आदिवासींचे पारंपारिक वेशभूषा परिधान करून महिला व पुरुष खरेदीसाठी दाखल झाले होते. त्या पाठोपाठ हॉटेल, पानाची दुकाने, शिकंजीची दुकाने, लहान मुलांची खेळणीचे मनोरंजनपर, पाळणे झुले, मौत का कुवा इत्यादी मनोरंजनाची साधने ही याठिकाणी आलेली होती. त्याचप्रमाणे थंड पेये दुकाने, लहान मुलांचे खेळण्याचे दुकाने मोठ्या प्रमाणात होती. भोंगर्या बाजारात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बोरद दूर क्षेत्राचे कॉन्स्टेबल गौतम बोराडे, विजय विसावे, नीलेश खोंडे, राजू जगताप, तुकाराम पावरा यांच्यासह महिला होमगार्ड नियुक्त करण्यात आले होते. बोरद येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण लांडगे तसेच त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आपली सेवा देत होते.