उठ प्रशासना जागा हो! अवैध गुटखा विक्रीला आळा हो!
नांदेड (प्रतिनिधी) संपूर्ण जगासह भारतानेही कोरोणाच्या हाहाकारीला सोसले. एकीकडे कोरोना/ओमिक्रोनच्या विळख्यातून बाहेर पडत असताना मुखेड तथा मुक्रामाबाद पोलीस स्टेशन हद्दीत मात्र कर्करोगाला मोठ्या प्रमाणात आमंत्रण देण्याचे कार्य चालू आहे. कर्करोगापासून मुक्तता मिळावी म्हणून सबंध महाराष्ट्राने गुटखाजन्य पदार्थावर बंदी घातली. जेणेकरून जनतेचे आरोग्य राखले जाईल. आणि याची जबाबदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग तथा पोलीस प्रशासनावर सोपवली.
मात्र सबंध मुखेड तालुक्यात पान टपरी व इतर भागात गुटख्याच्या पुड्या पाहिल्यानंतर संबंधित प्रशासनाच्या निष्क्रियतेचे आभाळभर दर्शन होते. कर्नाटक राज्यातून बिनदिक्कतपणे गुटखा मुखेड तालुक्यात आणला जात आहे. यात संबंधित प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. बंदी असलेल्या गुटख्यावर नियंत्रण राखण्यास अपयशी ठरलेल्या संबंधित प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वरती निलंबनाची कारवाई का केली जाऊ नये ? असा थेट सवाल इर्शाद पटेल व हबीब रहेमान यांनी उपस्थित केला. शिवाय हे गुटका विक्रीदार मुखेड व बाराहाळी येथील असल्याचे सांगितले जात आहे. कर्करोगास कारणीभूत गुटखा विक्रीदारावर तात्काळ कार्यवाही करून नियंत्रण नाही राखल्यास संबंधित प्रशासना विरोधात दि. १५ मार्च २०२२ रोजी मुखेड येथे आमरण उपोषणास बसत असल्याचे उपोषणकर्ते इर्शाद पटेल व हबीब रहेमान यांनी सांगितले आहे.