कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोणी कितीही प्रयत्न केला तरी समृद्धी मगामार्गाच्या नावावरुन माझं नाव कुणीही मिटवू शकत नाही. सध्या या महामार्गाच्या उद्घाटनाचं राजकारण सुरु आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा येत्या १ मेला म्हणजे महाराष्ट्र दिनी सुरु होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शेलू दरम्यानचा 220 किमीचा समृद्धी महामार्गाचा हा पहिला टप्पा आहे. तर नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्ग जूनमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेने नेणारा प्रकल्प अशी याची ओळख आहे. दरम्यान या रस्त्याच्या उ्घाटनावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
समृद्धी महामार्ग सुरु झाला पाहिजे याचा मला आनंद आहे. पण त्याची कामं अजून पूर्ण झालेली नाहीत ती कामं पूर्ण केल्यानंतरच त्याचं उद्घाटन केलं तर ते अधिक चांगलं होईल. घाई घाईत उद्घाटन आटपून घेतलं तर रस्ता सुरु होईल पण त्या रस्त्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व कमी होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कोणी कितीही प्रयत्न केला, तरी माझं नाव त्याच्यावरुन मिटवता येणार नाही. जनतेने त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आणि ही संकलपना वीस वर्ष माझ्या डोक्यात होती, की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे, त्यावेळी आम्ही तो करु शकलो. त्यावेळी या रस्त्याचा जो मोठ्याप्रमाणावर विरोध करत होते, आता ती लोकं या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगवाला आहे.