विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी झोकून द्यावे : एस.व्ही. गीते
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक उद्बोधन वर्ग
पहूर, ता. जामनेर : विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकांनी झोकून द्यावे , असे प्रतिपादन जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा महात्मा फुले शिक्षण संस्थेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एस . व्ही . गीते यांनी केले . महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित शिक्षक उद्बोधन वर्गात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
येत्या १३ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांनी जास्तीची मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित कराव्यात, सेतु अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, विविध समित्यांचे गठन करून शालेय विकासात भर घालावी. शाळा हे टीमवर्क आहे , सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी भरभरून देण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी सांगितले. एमटीएस, एनटीएस, एनएनएमएस , नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आदी स्पर्धा परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख तथा महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र वानखेडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे, अमोल क्षीरसागर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांनी आभार मानले.