एस.टी.च्या आस्थापना परवानेधारकांचा जीव मेटाकुटीस करोना अन कर्मचारी संपामुळे आर्थिक कंबरडेच मोडले,कर्जबाजारी होण्याची वेळ
चोपडा - विश्वास वाडे प्रतिनिधी
चोपडा : राज्य परिवहन महामंडळाच्या आवारात प्रवाश्यांच्या सोयीसाठी प्रत्येक बसस्थानकात तसेच मार्ग थांब्यांवर विविध वाणिज्य आस्थापना परवानेधारकांना भाडेतत्वावर चालविण्यासाठी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.परंतु गत दोन वर्षात कोविड १९ च्या निर्बंधांमुळे प्रवाशी वाहतूक बंद असल्यामुळे तसेच सद्यस्थितीत दि.८ नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या संपामुळे सर्वच बसस्थानके ओस पडली आहेत.त्याचा परिणाम या परिसरातील विविध वाणिज्य आस्थापनांवर झाल्याने परवानेधारकांचा जीव मेटाकुटीस आला असून कर्जबाजारी होण्याची दुर्धर वेळ त्यांच्यावर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताब्यातील सुमारे चारशे पेक्षा अधिक बसस्थानके व मार्ग थांब्यांवर प्रवाश्यांच्या सोयीचे दृष्टीने उपहारगृह,रसवंतीगृह,जनरल स्टोअर्स,स्नॅकबार,बेकरी स्टॅाल,चप्पल स्टॅाल,फळफळावळ स्टॅाल,केशकर्तनालय,वेगवेगळ्या वस्तुंचे फिरते विक्रते अशी विविध प्रकारची वाणिज्य आस्थापना विहित स्वरूपात निविदा काढून संबधित परवानेधारकांना चालविण्यास दिल्या आहेत.एस.टी.च्या प्रगती व अधोगतीशी या आस्थापनाधारकांचा नित्य संबध येत असतो.यापूर्वीच बसस्थानकात प्रवाश्यांची वाणवा झाल्यामुळे आस्थापना धारकांचे व्यवहार कमी झाले आहेत.प्रचंड आर्थिक ओढाताण या व्यावसायिकांना सहन करावी लागत आहे.
दरम्यानच्या काळात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शासनाने प्रवासास बंदी घातली परिणामी एस.टी.ची वाहतूक दोन वर्षात दोन वेळा बंद झाली.तसेच कोरोनाचे निर्बंध पाळतांना प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली.त्याचा सर्व परिणाम या आस्थापनाधारकांवर झाला आहे.बंद काळातील भाडे महामंडळाने कमी केले.पण महामंडळाच्या सुवर्णकाळाच्या ओघाने सुरु असलेले अव्वाच्या सव्वा झालेले भाडे भरणे परवानेधारकांना आता कर्जबाजारी पणाकडे नेत असल्याची भावना परवानेधारकात निर्माण झाली आहे.एस.टी.चा स्वतःचा वाहतूक व्यवसाय खाजगी वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर घटला आहे.त्याचाच परिणाम या व्यवसायांना सहन करावा लागत आहे.परवानेधारक अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत.त्यामुळेच व्यवसायांचे राजीनामे देण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत.
या सर्व परिस्थितीचा विचार करता एस.टी.महामंडळाने स्वतःच्या व्यवसायासोबत या परवानेधारकांच्या व्यवसायाच्या वाढीचा विचार करणे गरजे आहे.संपाला आता जवळपास पंधरा दिवस पूर्ण होत आहेत,अजून किती काळ हिच स्थिती राहणार हे सांगता येत नाही.त्यामुळे या काळातील आस्थापनांचे भाडे माफ करण्याची मागणी परवानेधारकांनी केली आहे.एस.टी.महामंडळाने या परवानेधारकांची भरमसाठ वाढलेली परवाना फी निम्म्याने करावी अशी मागणी परवानेधारकांची आहे.आस्थापना चालकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवन या व्यवसायावर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात हाल आपेष्टांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.कर्जबाजारीपणामुळे एस.टी.कर्मचाऱ्यांच्या पाठीमागून या आस्थापनाधारकांवर देखील आत्महत्त्या करण्याची वेळ येवू शकत असल्याने महामंडळ पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रकर्षाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.