कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
मुरबाड : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, नागांव, ता. मुरबाड, जि. ठाणे मार्फत, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. सुरेश द. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभेपाडा, ता. मुरबाड येथील दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त “उन्हाळी हंगामामध्ये शाश्वत दुध उत्पादन निर्मिती” या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी कुंभेपाडा गावातून 19 दुग्धउत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कृषि विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञांकडून ग्रामीण भागातील दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन ह्या कृषी आधारित उद्योगाचे शेतीमधील महत्व पटवून देण्यात आले. तसेच उन्हाळ्यामध्ये कमीतकमी पाण्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन, विविध हिरवा चारा निर्मिती तंत्र, उन्हाळ्यामध्ये भाकड व गाभण जनावरांचे पालनपोषण, दुधाची गुणवत्ता सुधारणे आणि विपणन या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशाल यादव, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी “हायाड्रोफोनिक पद्धतीने हिरवा चारा निर्मिती”, डॉ. मयूर नवले, विषय विशेषज्ञ (पीकसंरक्षण) यांनी “चार पिकावर येणाऱ्या विविध किडी व रोगांचे व्यवस्थापन”, प्रणाली ठाकरे (कृषी विस्तार शिक्षण) यांनी “दुधाच्या शहरी भागामधील विविध विपणन पद्धती” आणि कु. अस्मिता म्हात्रे, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) यांनी “दुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मिती ” या विषयांवर मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने दुग्धउत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूर नवले यांनी तर आभार प्रदर्शन ऋषभ पाटील यांनी केले. कृषि विज्ञान केंद्राचे इतर कर्मचारी श्रुती गायकवाड, सुजित गुंजाळ व कल्पेश दळवी यांचे कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विशेष सहकार्य लाभले.