चोपडा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई प्रतिबंधित बॉयोडिझेलचा अवैध साठा जप्त; पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जमा व एकास अटक
चोपडा : विश्वास वाडे , तालुका प्रतिनिधी
चोपडा : तालुक्यातील हातेड गांवानजीक असलेल्या हॉटेल व्दारकाधीश येथे बाजूलाच असलेल्या पत्री शेडमध्ये प्रतिबंधित बॉयोडिझेलचा अवैध साठा पकडण्यात चोपडा ग्रामीण पोलीसांना यश आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन हॉटेल व्दारकाधीशचा मालक जाधव रामजी शिंदव रा.पंपनगर, लासूर यांस अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सरकारने बॉयोडिझेल साठवणूक व विक्रीला बंदी घातली आहे. मात्र तरीही काही लोक याची छुप्या पद्धतीने विक्री करतांना आढळून येत आहे. असाच प्रकार चोपडा तालुक्यातील हॉटेल व्दारकाधीश च्या बाजुला असलेल्या पत्री शेडमध्ये आढळून आला. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार त्यांनी सदर ठिकाणी छापा मारला. तिथे जवळपास 5000 लिटर प्रतिबंधित बॉयोडिझेलचा अवैध साठा आढळुन आला. याठिकाणी वाहनांत डिझेल भरण्याकरीता वापरण्यात येणारी सर्व साधनसामग्री सुद्धा मिळून आली. यावेळी पुरवठा विभागाला कळविण्यात आले. त्या अनुषंगाने घटनास्थळी प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर व पुरवठा निरिक्षक शिवराज पवार यांनी येत पंचासमक्ष पंचनामा करुन सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याठिकाणी हॉटेल मालक जाधव रामजी सिंदव हाच प्रतिबंधित बॉयोडिझेलची विक्री व साठवणुक करीत असल्याचे पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत आढळून आले.
विशेष म्हणजे काल रात्री हा प्रतिबंधित बॉयोडिझेलचा अवैध साठा येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती. म्हणुन त्यांनी आज लागलीच त्याठिकाणी छापा टाकुन प्रतिबंधित बॉयोडिझेलसह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस. गुरनं. 221/2021 भादंवि. कलम 285, 188, सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3 व 7 सह स्फोटक अधिनियम 1884 चे कलम 9(ब), (1)(ब) सह मुंबई वजन व मापे अधिनियमानुसार चे कलम 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.व संशयित जाधव रामजी शिंदव रा. लासुर यांस अटक करण्यात आली.सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉं. प्रविण मुंढे, चोपडा विभागाचे डिवायएसपी कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक अमर वसावे, सहा.फौजदार देविदास ईशी, पोहेकॉं. संजय येदे, पोहेकॉं. राजु महाजन, पोहेकाँ. लिलाधर भोई , पोकाँ. सुनिल कोळी आदिंसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. व पुढील तपास पोलीस निरिक्षक देविदास कुनगर हे करीत आहेत.