चोपडा तालुक्यातील कोळंबा तापी नदी वाळू उपसा थांबवून कारवाई करावी ; कठोरा ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जळगाव : चोपडा (जिल्ह्या विशेष प्रतिनिधी) तालुक्यातील कोळंबा तापी नदी वाळू ठेक्यातून ठरल्यापेक्षा जास्तीचा अवैध्य वाळू उपसा होत असून त्याचा तापी नदीच्या अस्तित्वावर परिणाम होत आहे, त्यामुळे अवैध वाळू उपसा थांबवावी आणि ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी कठोरे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून केली आहे.
चोपडा तालुक्यातील कोळंबा गावलगतच्या तापी नदीपात्रात 1500 ब्रास वाळू उपसाचा ठेका या वर्षी गेला आहे. सदर वाळू ठेका निविदानुसार फक्त गट क्रमांक 20, 30,31,32,33 या गटासमोरील वाळू उपसा करण्यासाठी परवानगी आहे. तरीही जळगांव तालुक्यातील भोकर व पळसोड या गावाच्या हद्दीतील आणि चोपडा तालुक्यातील कठोरे गावलगतच्या इतर वाळू गटांच्या समोरील वाळू मोठ्याप्रमाणावर अवैधरित्या उपसा होत आहे. सदर वाळू ठेका हा फक्त 1500 ब्रासचा असून त्यातून आजतागायत 1500 ब्रास पेक्षा मोठ्याप्रमाणावर वाळू अवैधरित्या उपसा होत आहे. या अतिरिक्त वाळू उपसमुळे तापी नदी पात्रात मोठे मोठे खड्डे पडत असून त्यामुळे भविष्यात धोका निमार्ण झाला आहे. तसेच यामुळें महसूल ही बुडवला जात आहे. तापी नदी आमच्यासाठी जीवनवाहिनी आहे त्यामुळे तिचं अस्तित्व ठिकावे अशी सर्व तापी परिसरातील लोकांची भावना आहे.
या अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी चोपडा महसूल प्रशासनाचे सहमती असल्याचे दिसते. वाळू माफियाची तक्रार करूनही कोणती कारवाई होत नाही उलट तक्रार करण्याऱ्या लोकांना वाळू माफियांकडून धमक्या देण्यात येतात.
चोपडा आणि जळगाव तालुक्यातील गावांना पाण्यासाठी फक्त तापी नदी पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. तसेच मागील काही दिवसांपासून तापी परिसरातील कठोरे गावलगतच्या शेतकऱ्यांचा तापी नदीतील अल्प पाणी उपलब्धता मुळे चोपडा नपच्या पाणीपुरवठा योजनेस मोठा विरोध असताना तापी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. वाढत्या वाळू उपसामुळे जमिनीत भूजल पुनर्भरण खूप कमी प्रमाणात हिट आहे. चोपडा नप च्या पाणीपुरवठासाठी आणि भूजल पातळी वाढण्यासाठी महत्वाचा असलेल्या डोहाच्या आजूबाजूची वाळू मोठ्या प्रमाणात उपसली जात आहे आणि त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह दिशा बदलू शकतो आणि डोह कोरडा पडू शकतो आणि याचा पाणी पुरवठा योजने सोबत शेतकऱ्यांनाही खूप मोठा फटका बसेल आणि भविष्यात मोठं अस्मानी संकट उभे राहील.
त्यामुळे आम्ही सर्व तापी परिसरातील शेतकरी आणि कठोरे ग्रामस्थ आपणास कळकळीची विनंती करतो की आपण सदर ठेक्यावर आणि ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि तापी नदीपात्रातील वाळू उपसा कायमचा बंद करावा.आणि यापुढे चोपडा तालुक्यातील तापी नदीपात्रातील वाळू ठेके कायमचे बंद करावेत. आपण सदर ठिकाणी महसूल खात्यासोबत भेट देऊन पंचनामा करावा आणि सर्व दोषींना कठोर शिक्षा करावी.
तापी परिसरात वाढत्या अवैधरित्या वाळू उपसामुळे गावागावात गावगुंड व माफियागिरी मोठ्या प्रमाणात वाढत असून तापी परिसरातील गावांमध्ये अशांतता आणि भीतीचे वातावरण आहे. सामान्य लोकांमध्ये वाळू माफियांचा विरोध करण्याचे धाडस नाही. त्यामुळे जिल्ह्याचे प्रमुक म्हणून जिल्हाधिकारी साहेब तुम्ही यावर योग्य कारवाही कराल अशी अपेक्षा आहे. वाढत्या वाळू उपसामुळे आमच्या गावाचे रस्त्यांवर मोठ्या वेगाने ट्रॅक्टर चालवले जातात त्यामुळे अपगातांचे प्रमाण वाढले असून रस्त्यावर पायी चालणं मुश्किल झाले आहे.
5 कोटी रुपये खर्च करून गावाचे रस्ते PMGSY अंतर्गत बनवले असून ते रस्ते अवैध वाळू उपशामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत. आम्ही सर्व कठोरे ग्रामस्थ आपणास हात जोडून विनंती करतो की कृपया सदर विषयात लक्ष घालून अवैध वाळू उपसा थांबवावी आणि ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी. जर प्रशासनाने काही पाऊलं उचचली नाहीत तर आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या तक्रारींमुळे जर आमच्या कठोरे ग्रामस्थांना काही धमक्या किंवा त्रास झाला तर यास प्रशासन जबाबदार राहील. समस्त कठोरे ग्रामस्थांनी ही मागणी व ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे.