नवीन कल्पक सुविधा निर्माण करण्याचेही नियोजन करावे : प्रमोद देशमुख
नांदेड (जावेद अहमद) आज संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संचलित श्री छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल या प्राथमिक शाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित २०२२ ते २०२६ पर्यंतच्या धोरणात्मक नियोजनाचे सादरीकरण प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर मठदेवरू यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी संस्थेच्या प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांच्या क्षमता व अवगत कौशल्यांची एकत्रित नोंद असावी असे सुचवले व प्रत्येकाने सतत नावीन्याचा ध्यास घेऊन आपल्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा असे सांगितले.
यावेळी शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीसह विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचा विकास करण्यासाठीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून हे धोरणात्मक नियोजन तयार केले होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कौशल्याधारित व्यवसाय शिक्षण विचारात घेता शाळेचे वेळापत्रक कसे असावे या विषयी चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी आपल्या विषयातील अभ्यास (व्यासंग) वाढविणे गरजेचे आहे असे मत संस्थेच्या शैक्षणिक समन्वयिका श्रद्धाताई देशमुख यांनी मांडले. यावेळी संस्थेच्या इतर विभाग प्रमुखांनी देखील मार्गदर्शन केले. हे नियोजन करण्यासाठी संस्थेच्या नवीन शैक्षणिक धोरण समितीचे समन्वयक आकाश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी संस्था पदाधिकारी, विभागप्रमुख व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.