24 वर्षांत प्रथमच महाराष्ट्रातील राज्यसभा बिनविरोधाची परंपरा मोडीत ; घोडेबाजार होणार हे स्पष्ट !
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीच्या बिनविरोधची परंपरा २४ वर्षानंतर मोडीत निघत अखेर राज्यात निवडणूक लागली आहे. तीन जून दुपारी ३ पर्यंत कोणीही उमेदवारी मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे.
राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषद निवडणुकीसाठी एका जागेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, भाजपनेही तीच ऑफर महाविकास आघाडीला देत तिसऱ्या उमेदवारावर ठाम असल्याचे सांगतिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर भेटही झाली, पण या भेटीतून काहीच साध्य झाले नाही. अखेर दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सकाळी साडे अकरानंतर महाविकास आघाडीकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे दुपारी तीन वाजता सांगत भाजपची बाजू मारून नेली. चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगितल्यानंतर निवडणूक आणि पाठोपाठ घोडेबाजारही येणार असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यात 24 वर्षांनी प्रथमच अशी वेळ ओढावली
राज्यातील राजकीय सुंदोपसुंदीमुळे महाराष्ट्रात 24 वर्षांनी पहिल्यांदाच राज्यसभेसाठी निवडणूक लागली आहे. यापूर्वी, 1998 मध्ये राम प्रधान आणि प्रमोद महाजन यांच्या उमेदवारीवरून राज्यसभा निवडणूक पार पडली होती. हा एक अपवाद वगळल्यास महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार अटळ
विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात राजकीय आणि सुरक्षा यंत्रणांची सुरु असलेली साठमारी नवीन नाही. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आता राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र, यामुळे राज्यसभेसाठी असणारी बिनविरोध परंपरा मात्र मोडीत निघाली आहे.
कशी होणार निवडणूक ?
राज्यसभेसाठी 10 जूनला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
4 वाजेनंतर मतदान मोजायला सुरुवात होईल.
विधानभवनाच्या सेंट्रल हाॅलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल
मतदान करणार त्या ठिकाणी बुथ कंपार्टमेंट सहा फुटांचा असणार
मतदान करताना सदस्यांना मोबाईल बाहेर ठेवून आतमध्ये जाता येणार
प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी आतमध्ये असणार