मुंबई : राज्यात उद्यापासून ३ दिवस अवकाळी पाऊस ; विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस !
मुंबई (प्रतिनिधी) थंडीनंतर महाराष्ट्राला उन्हाचे चटके बसू लागले असतानाच हवामानात होत असलेल्या स्थित्यंतरामुळे राज्यातील बहुतांश भागांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ते ९ मार्च दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातदेखील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. ७ ते ९ मार्चदरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोकणात ढगाळ वातावरण राहील. हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
– कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग